Girl’s Hair Cut case At Dadar Station: मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात एक विचित्र घटना घडल्याचे समोर आले. १९ वर्षीय तरुणी महाविद्यालयात जात असताना तिच्या मागे चालणाऱ्या व्यक्तीने तरुणीचे केस कापले होते. ही बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने मागे वळून बघताच आरोपीने कैची बॅगेत टाकून तिथून पळ काढला. यानंतर संबंधित तरुणीने तक्रार दाखल करताच मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून आरोपीचा शोध घेतला आणि चेंबूर येथील रहिवासी दिनेश गायकवाड (३५) याला अटक केली. चौकशीमध्ये या गुन्ह्यामागचे अजब कारण आरोपीने सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय?

पीडित तरुणी सोमवारी सकाळी ९.२९ च्या सुमारास माटुंगा येथील महाविद्यालयात जाण्यासाठी कल्याणहून दादर रेल्वे स्थानकावर आली. तिकीट आरक्षण खिडकीजवळून पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलाकडे जाताना तिला अचानक काही तरी टोचल्यासारखे वाटले. मागे वळून पाहिले असता, एक अनोळखी व्यक्ती कॅची बॅगेत टाकून घाईघाईने निघून जात असल्याचे तिला दिसले. यावेळी तिला तिचे केस जमिनीवर पडल्याचेही दृष्टीस पडले. मुलीने तत्काळ दादर येथील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) विभागाला घटनेची माहिती दिली. त्यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७९ अंतर्गत गुन्हे दाखल केला.

रेल्वे पोलिसांचे एक पथक आरोपीच्य शोध घेत होते. घटना घडलेल्या ठिकाणी मंगळवारी सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. दिनेश गायकवाड (३५) एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. तो मनोरुग्ण नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

लांब केस आवडत नसल्यामुळे ते कापले

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला महिलांचे लांब केस आवडत नाहीत. त्यामुळे त्याने हा प्रकार केला. सोमवारी त्याने तरुणीचे केस कापून कैची बॅगेत टाकून पळ काढला होता. याआधी ऑगस्ट २०२४ मध्येही त्याने एका ४० वर्षीय महिलेचे केस कापल्याचा प्रकार आता समोर आला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील आहेत का? आणि आतापर्यंत किती महिलांबरोबर असा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader