लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून १९ वर्षीय तरूणी जात असताना, अनोळखी व्यक्तीने तिचे केस कापल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून आरोपीचा शोध घेतला. याप्रकरणी चेंबूर येथील रहिवासी दिनेश गायकवाड (३५) याला अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

पीडित तरुणी सोमवारी सकाळी ९.२९ च्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकावर आली. तिकीट आरक्षण खिडकीजवळून पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलाकडे जाताना तिला अचानक तिला काही तरी टोचल्यासारखे वाटले. मागे वळून पाहिले असता, एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन घाईघाईने निघून जात असल्याचे तिला दिसले. यावेळी तिला तिचे केस जमिनीवर पडल्याचे दृष्टीस पडले. मुलीने तत्काळ दादर येथील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) विभागाला घटनेची माहिती दिली. त्यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७९ अंतर्गत गुन्हे दाखल केला. तसेच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे

रेल्वे पोलिसांचे एक पथक आरोपीच्य शोध घेत होते. घटना घडलेल्या ठिकाणी मंगळवारी सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. दिनेश गायकवाड (३५) एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. तो मनोरुग्ण नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. हा प्रकार त्याने का केला याचा, तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man cut hair of young woman during train journey railway police arrest accused mumbai print news mrj