थांबा मागे गेल्याच्या गडबडीत चालत्या बसच्या मागच्या दरवाजातून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ५८ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. हा अपघात शनिवारी रात्री अंधेरी-वर्सोवा या दरम्यान झाला. त्यानंतर या प्रवाशाला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पाठीला गंभीर मार बसल्याने रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
अंधेरी येथून वर्सोव्याला जाणाऱ्या २५१ क्रमांकाच्या बसमधून रोहीदास नाटेकर (५८) प्रवास करत होते. त्यांना गंगा भवन येथे उतरायचे होते. मात्र बस थांब्यावरून पुढे गेल्यानंतर आपला थांबा चुकल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी चालत्या बसच्या मागच्या दरवाजातून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल गेल्याने ते पाठमोरे पडले. या अपघातात त्यांना गंभीर इजा झाल्याने त्यांना त्वरीत कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास नाटेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Story img Loader