मुंबईतील खार परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणासोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. संबंधित तरुणाने गूगलवर ‘बॉडी मसाज’ असं सर्च केलं असता, तो एका एस्कॉर्ट वेबसाइटवर (लैंगिक संबंधासाठी महिला पुरवणारं संकेतस्थळ) पोहोचला. संबंधित वेबसाइटवर त्याला त्याच्या बहिणीचा आणि पत्नीचा फोटो आढळला. हा फोटो पाहून तरुणाला धक्का बसला. त्याने एस्कॉर्ट वेबसाइटवरील फोटोंबाबत आपल्या बहिणीला आणि पत्नीला विचारणा केली असता, संबंधित फोटो पाच वर्षांपूर्वी सोशल मीडिया शेअर केल्याचं बहिणीने सांगितलं.

नेमका प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाने वेबसाइटवरील फोटोवर क्लिक केलं आणि मोबाईल क्रमांक मिळवला. संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांकावरील प्रोफाइल फोटोही त्याच्या बहिणीचा होता. त्यामुळे त्याने त्या क्रमाकांवर मेसेज पाठवला असता, एका अज्ञात महिलेनं मेसेजला प्रतिसाद दिला. दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर तक्रारदार तरुणाने संबंधित महिलेला खार पश्चिम परिसरातील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलावलं. यावेळी त्याची बहीण आणि पत्नीही त्याच्यासोबत उपस्थितीत होती.

हेही वाचा- मुंबईतील अंधेरी आणि मालाडमधून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; गेल्या चौदा वर्षांपासून वास्तव्यास असल्याचे उघड

अज्ञात महिला खार परिसरात भेटायला आली असता त्याने वेबसाइटवरील फोटोंबाबत तिच्याकडे विचारणा केली. पण तिने रस्त्यावरच आरडाओरडा करायला सुरुवात केली. तसेच पळून जाण्याचा प्रयत्न करून लागली. पण तक्रारदाराची पत्नी आणि बहिणीने आरोपी महिलेस पकडून खार पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.