भिवंडीतील काल्हेर गावाच्या हद्दीत जय मातादी कम्पाउंडमधील एका औषधाच्या गोदामात काम करणाऱ्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या तरूणास नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. अमोल जयसिंग समगीर (२४, साकीनाका, मुंबई) असे या तरूणाचे नाव आहे.
गेली काही वर्षे या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र अमोलने लग्नास नकार दिला. त्यानंतर या तरूणीने साकीनाका येथील अमोलच्या घरासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी त्वरीत रुग्णालयात हलवून तिचे प्राण वाचविले. याचवेळी साकीनाका पोलिसांना हे प्रकरण समजले. त्यांनी या घटनेचा गुन्हा तपासासाठी नारपोली पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. त्यानंतर अमोलला गुरूवारी अटक झाली. न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.