वडिलांच्या नावे असलेला लेबर कंत्राट परवाना विकण्याच्या वादावादीतून   घाटकोपर येथे सोमवारी दुपारी रौनक गोगारी (वय २७) या तरुणाने स्वत:च्या ६२ वर्षीय आईचा गळा घोटून तिला ठार केले आणि आईला वाचवू पाहणाऱ्या मयूर या आपल्या लहान भावाचाही गळा घोटला. रौनकने स्व:तच घाटकोपर पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून अंगावर काटा आणणाऱ्या आपल्या कृत्याची माहिती दिली. पोलिसांनी रौनकला अटक केली असून मयूर रुग्णालयात मृत्यूशी झुंजत आहे.
घाटकोपर पश्चिमेला असलेल्या गंगावाडी येथील चिंतामणी अपार्टमेण्टमध्ये राहणाऱ्या चेतना गोगारी (६२) यांच्या पतीच्या नावे लेबर कंत्राटाचा परवाना होता. मात्र त्यांचे निधन होऊन काही वर्षे लोटली होती. हा परवाना विकण्याचा तगादा शहापूर येथे पत्नीसह राहणारा त्यांचा मोठा मुलगा रौनक याने लावला होता. सोमवारी दुपारी तो घाटकोपर येथे आईच्या घरी आला. त्या वेळीही हा परवाना विकण्यावरून रौनक आणि आई यांच्यात वादावादी झाली. रागाच्या भरात रौनकने आपल्या आईला मारहाण करायला सुरुवात केली. त्याचा भाऊ मयूर त्या दोघांमध्ये पडला असता त्यालाही मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्याने रौनकने साडीने चेतना यांचा गळा आवळला. चेतना बेशुद्ध पडल्यानंतर रौनकला अडवायला आलेल्या मयूरचा गळाही रौनकने बनियानने आवळला. अखेर मयूरही बेशुद्ध पडला.
यानंतर रौनकने घाटकोपर पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना चेतना आणि मयूर बेशुद्धावस्थेत आढळले. पोलिसांनी या दोघांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच चेतना यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयूरला तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

स्वत:च माहिती दिली
रौनकने रागाच्या भरात आईचा गळा दाबला आणि लहान भावाचाही गळा बनियनने आवळला. हे दोघेही बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्यावर रौनकने घाटकोपर पोलिसांना स्वत: दूरध्वनी करून झाल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस घरी आले तेव्हा तो तिथेच बसून होता.

Story img Loader