मुंबई : महसूल गुप्तावार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत अजगर व सापांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आरोपीकडून नऊ अजगर, दोन साप जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> गोरेगावमध्ये तडीपार आरोपीचा पोलिसांवर हल्ला
संशयीत आरोपी वन्यजीवांची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्याकडील एका पाकीटाची तपासणी असता त्यात नऊ अजगर (पायथन रेगियस) आणि दोन साप (पॅन्थेरोफिस गट्टाटस) सापडले. सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत ते जप्त करण्यात आले. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त केलेल्या साप व अजगरची माहिती घेतली असता ते परदेशातील असल्याचे समजले. त्यामुळे आरोपींनी आयात धोरणाचे उल्लघंन केल्याचे निष्पन्न झाले. अजगर आणि साप पुन्हा बँकॉकला पाठवण्यात येणार आहेत. सध्या सरपटणारे प्राणी विमान कंपनीच्या ताब्यात देण्यात आले असून विमान कंपनीच्या मदतीने पुन्हा बँकॉकला पाठवण्यात येणार आहेत. याप्रकरणी प्राणी घेऊन आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.