लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः महिलेने वेळेवर नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याचा गंभीर प्रकार कुर्ला परिसरात घडला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबना नाही, तर त्याने पत्नीवर चाकू व स्कू ड्रायवरनेही हल्ला केला. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ३४ वर्षीय पत्नीला कुर्ल्यातील भा.भा. रुगणालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुडिया मोहम्मद फय्युम खान (३४) असे जखमी महिलेचे नाव आहे. कुर्ला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या गणेश बाग लेन येथे गुडिया पती फय्युम जहीर खान (३८) याच्यासोबत राहत होत्या. गुडिया यांनी गुरूवारी वेळेवर नाश्ता बनवला नसल्यामुळे फय्युमने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. संतापलेल्या फय्युमने शिलाई मशीनच्या शेजारी ठेवलेला हातोडा उचलून गुडिया यांच्या डोक्यात मारला. त्यानंतर घरातील चाकूने गुडिया यांच्या गळ्यावर तीन वार केले. तेवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने घरातील स्क्रू डायवरने पत्नीच्या डोक्यावर मारले. त्यात गुडिया यांच्या भुवईवर गंभीर दुखापत झाली.
आणखी वाचा-मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साडेपाच हजारांहून अधिक वाहन खरेदी
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या गुडिया यांना तात्काळ कुर्ला येथील भा.भा. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी गुडिया खान यांचा जबाब नोंदवला. जबाबात त्यांनी पत्नीने हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी फय्युम खानविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.