लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कांदिवली येथे महिला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली. आरोपी शिवशंकर दत्ताने (४०) पत्नी पुष्पावर (३६) विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेऊन तिची हत्या केल्याची कबुली दिली. पत्नीला मारताना त्यांचा आठ वर्षांचा मुलगा शायन जागा झाला आणि त्याने हा प्रकार पाहिला. त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने दत्ताने मुलाचीही हत्या केली. नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.

पुष्पा आणि शायन यांचे मृतदेह सोमवारी दुपारी नरसीपाडा येथील त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. हे कुटुंब मुळचे पश्चिम बंगालमधील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टेम्पोचालक दत्ता कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना हे मृतदेह सापडले. पुष्पाने मुलाची हत्या करून आत्महत्या केली असावी, असे त्याने पोलिसांना सांगितले.

समता नगर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पत्नीने आत्महत्या का केली याचे ठोस कारण तो चौकशीत सांगू शकला नाही. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. शवविच्छेदन अहवालातून आत्महत्येऐवजी हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दत्ताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने दोघांचा खून केल्याची कबुली दिली, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

चौकशीदरम्यान दत्ताने सांगितले की, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे रागाच्या भरात त्याने नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह लटकवून आत्महत्येचा बनाव करण्याच्या प्रयत्नात तो होता, तेव्हा मुलगा जागा झाला आणि त्याने वडिलांना पाहिले. हे समजताच, त्याने मुलाचीही हत्या केली आणि दोघांचे मृतदेह छताला लटकवल्याचे त्याने चौकशीत सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दत्ताने हे कृत्य रात्री केले असावे, परंतु नेमकी वेळ शवविच्छेदन अहवाल आल्यावर कळेल, असे पोलिसांनी सांगितले. हत्या केल्यानंतर तो घराबाहेर गेला आणि दुपारी परत आल्यावर शेजाऱ्यांना बोलावून पत्नीने मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केला. शेजाऱ्यांना खिडकीतून घरातील दृश्य दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्याने केला. सुरूवातीला याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीनंतर दत्ताला भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत अटक करण्यात आली.

Story img Loader