मुंबई : मोबाइलवर जोरात संभाषण करण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला इमारतीतून खाली ढकलल्याची घटना सोमवारी कांदिवली परिसरात घडली. घटनेनंतर जखमी व्यक्तीला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत व्यक्तीला धक्का देणाऱ्या २५ वर्षीय आरोपीविरोधात कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कांदिवली पश्चिम येथे भाटीया शाळेसमोरील साईबाबा नगर परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणीच ही घटना घडली. या घटनेत जितेंद्र चव्हाणचा मृत्यू झाला. चव्हाण बांधकामस्थळी कामगार म्हणून काम करीत होता. चव्हाण व इतर कामगार त्याच ठिकाणी सकाळी काम करायचे आणि रात्री तेथील खोल्यांमध्ये झोपायचे. जितेंद्र चव्हाण, सुतारकाम करणारा त्याचा मित्र मनोज चव्हाण व आरोपी अफसर जमीरुद्दीन आलम (२५) हे दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीमध्ये राहत होते.
मोबाइलवरील संभाषणावरून वाद
संध्याकाळी काम संपल्यावर आलम मोबाइलवर व्हीडीओ बघत बसायचा. मोबाइलवरून दूरध्वनी करून जोरजोरात बोलायचा. त्याचा जितेंद्र चव्हाणला त्रास होत होता. रविवारी रात्रीही आलम मोबाइलवर जोरजोरात बोलत होता. त्यामुळे जितेंद्र संतापला. त्याने आलमसोबत भांडण केले. भांडण सुरू असताना जितेंद्रने आलमच्या डोक्यात चापट मारली. त्यामुळे संतापलेला आलम जितेंद्रच्या अंगावर धावून गेला व त्याने जितेंद्रला धक्का दिला.
धक्का दिल्यानंतर जितेंद्र दुसऱ्या मजल्यावरून तळघरातील दोन मजले खाली असलेल्या वाहनतळात कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जितेंद्र खाली कोसळताच गोंधळ उडाला. सर्व कामगार जितेंद्र पडलेल्या ठिकाणी धावले. जितेंद्र गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी जितेंद्रचा मृत्यू झाला.
आरोपीला अटक घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांना घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना घडलेल्या प्रकार समजला. पोलिसांनी जितेंद्रचा मित्र मनोज चव्हाणचा जबाब नोंदवला. त्याच्या जबाबावरून कांदिवली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी राहत्या इमारतीतून आलमला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याचा गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी त्याला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक (कांदिवली पोलीस ठाणे) रवींद्र अडाणे यांनी दिली. याप्रकरणी कांदिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.