मुंबईतील चेंबूर भागात मुलगा होत नाही म्हणून एकाने दिवसाढवळ्या पत्नीला पेट्रोल टाकून आगीच्या हवाली केलं. आरोपीचं नाव संजय ठाकूर (३७) असं आहे. आरोपीने याआधीही अनेकदा पत्नीवर कौटुंबिक हिंसाचार केला होता. पीडित महिला या अत्याचाराला कंटाळून आपल्या मुलींसह बहिणीकडे रहात होती. मात्र, आरोपीने तिथं जाऊन तिच्यावर हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती सध्या धोक्याच्या बाहेर आहे. पीडित महिलेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं, “सरिता आणि संजय यांचं १३ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना चार मुली आहेत. याचा राग मनात धरून संजय कायम सरिताला मारहाण करायचा.”
पत्नी बहिणीकडे राहते म्हणून चारित्र्यावर संशय
“दररोजच्या त्रासाला कंटाळून सरिता मुलींना घेऊन बहिणीकडे रहायला गेली. ती तिथेच रोजंदारीवर कामाला जाऊन संसार चालवत होती. मात्र, संजय तिथे जाऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्रास द्यायचा. सरिताचे विवाहबाह्य संबंध असल्यानेच ती बहिणीकडे राहते असा आरोप तो करायचा. याबाबत सरिताने दोनदा पोलीस तक्रारही दिली होती,” अशी माहिती पीडितेच्या भावाने दिली.
नेमकं काय घडलं?
मागील काही महिन्यांपासून आरोपी संजय दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. पत्नीचे बाहेर इतर पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याने ती आपल्याकडे परत येत नाही, असा आरोप तो करायचा. इतकंच नाही तर तो पत्नी रहात असलेल्या बहिणीच्या घरी यायचा आणि तिला त्रास द्यायचा. पीडित महिला कामावर जात असताना तो तिचा पाठलाग करायचा.
हेही वाचा : राजीनामा द्यायला सांगितला म्हणून ऑफिसमध्ये बाँब ठेवल्याची अफवा पसरवली; बंगळूरमधल्या कर्मचाऱ्याचा प्रताप
घटना घडली त्या दिवशीही पीडित महिला कामावर जात होती. त्यावेळी आरोपीने तिला रस्त्यात अडवलं. तिलाच्यावर पेट्रोल ओतलं आणि सिगारेटच्या लायटरने तिला आग लावली. यानंतर इस्माईल शेख नावाच्या एका रिक्षाचालकाने पीडितेवर पाणी ओतून आग विझवली आणि प्रवाशांच्या मदतीने तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर आरोपी पतीविरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.