लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून एका व्यक्तीने उडी मारल्याचा प्रकार सोमवारी घडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम राबवली. त्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरू असून त्याच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सोमवारी सकाळी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी प्राप्त झाला होता. त्यात एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे पोलिसांना समजले. शिवडी पोलीस ठाणे हद्दीतील अटल सेतूवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक सावर्डेकर, ठाणे अमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक साकोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

आणखी वाचा-मुंबई : वृद्धांच्या घरात शिरून चोरी, आरोपी महिलेला अटक

घटनास्थळी उडी मारणाऱ्या इसमाची लाल रंगाची मोटारगाडी (ब्रेझा) क्र. MH01DT9188 उभी होती. ती मोटरगाडी सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शिवडी पोलिसांच्या हद्दीत अटलसेतूवर ८.५ किमी अंतरावर व्यक्तीने मोटरगाडी थांबवली व त्यानंतर त्याने उडी मारली.

अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असता घटना सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी घडल्याचे दिसते. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले. त्या व्यक्तीचा स्पीड बोटीच्या साहाय्याने शोध सुरू आहे. संबंधीत व्यक्तीच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांना याबाबत कळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.