एका ४० वर्षीय आरोपीनं कुर्ला येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संबंधित खटल्यातून मुक्त न झाल्याने आणि वारंवार सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावं लागत असल्याने आरोपीनं हे कृत्य केलं आहे. या प्रकारानंतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी दुपारी ही घटना घडली. जावेद सुभाष शेख उर्फ प्रदीप सुभाष तायडे असं ४० वर्षीय आरोपीचं नाव आहे. २०१६ मध्ये खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी तायडे याला दोषी ठरवलं होतं. याप्रकरणी पाच वर्षे त्याला तुरुंगवासही भोगावा लागला. अलीकडेच त्याला जामीन मंजूर झाला. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध एका जुन्या खटल्याची सुनावणी सुरू होती. धारदार शस्त्राने हल्ला करणे, घरफोडी करणे, अतिक्रमण करणे, अशा विविध कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा- “सेक्स करता आला नाही”, बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटलेल्या तरुणाचा सरकारवर १० हजार कोटींचा दावा

घटनेच्या दिवशी शनिवारी न्यायालयाने तायडे विरोधातील सुनावणी पुढे ढकलली. यानंतर आरोपी तायडेचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्याने न्यायालयात आदळआपट करायला सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीनं मागणी केली की, त्याच्यावरील सर्व प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढावेत आणि न्यायालयाच्या खटल्यातून मुक्तता करावी.”

न्यायालयात नेमकं काय घडलं?

न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर, आरोपीनं सर्वप्रथम त्याच्यासमोरील प्रत्येक वस्तुवर हात मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला जवळच एक चप्पल सापडली, त्याने ती उचलली आणि न्यायाधीशांच्या दिशेनं फेकली. या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाली नाही. पण न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तायडेला ताब्यात घेतलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man throw slipper at judge in kurla mumbai attempt to murder case rmm