साक्ष देण्यासाठी उशीर झाल्याबाबत विचारणा करणाऱ्या पोलिसाला तरुणाने सत्र न्यायालयातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार पोलीस शिपाई रवींद्र पवार ॲन्टॉप हिल पोलस ठाण्यात कार्यरत आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : व्यापाऱ्याची आरे कॉलनी परिसरात आत्महत्या
बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गेल्यावर्षी ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सदर तरुण साक्षीदार आहे. मंगळवारी त्याला साक्षीसाठी सत्र न्यायालयात उपस्थित रहायचे होते. पण तो उशीरा आल्यामुळे तक्रारदार पवार यांनी त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने तक्रारदार पवार यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडली व त्यांना जोरजोरात ओढू लागला. या झटापटीत पवार यांची मान व छातीला दुखापत झाली. अखेर पवार यांनी त्याच्याविरोधात कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी भादंवि कलम ३५३ व ३३२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी या तरुणाला अटक केली.