अंधेरी परिसरात साबरशिंगांची विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात दा. नौ. नगर पोलिसांना यश आले. आरोपींकडून सांबराची शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत. बाजारात त्याची किंमत २० लाख रुपये आहे. आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> Mumbai Rain Red Alert : मुंबईत सर्वाधिक पाऊस कुलाबामध्ये, चर्चगेट जलमय
अंधेरी पश्चिम परिसरातील गुलमोहर क्रॉस रोड येथे सांबरशिंगांची विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती दा. नौ. नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पवार यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद कुरडे, तसेच दिवसपाळी देखरेख पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सांबराच्या कवटीसह शिंगे हस्तगत करण्यात आली.
हेही वाचा >>> ठाणे – बोरिवलीदरम्यान बेस्ट प्रवाशांचे हाल, ठाणे – मागाठाणे बेस्ट बसचे तीन थांबे वगळले
याप्रकरणी पोलीस ठाण्यात ९, ३९, ४८ (अ), ४९ (ब) सह कलम ५१ वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल आला आहे. मनोज सुरेश बरप उर्फ भूत्या (२४), हर्ष मनीष दुबे (२२) व आशितोष सुखदेव सूर्यवंशी (२२) अशी अटक आरोपीची नावे आहेत. हे सर्व आरोपी बोरिवली पूर्व परिसरात वास्तव्यास आहेत. हर्ष व आशितोष काजुपाडा परिसरातील, तर मनोज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नवापाडा येथील रहिवासी आहे. आरोपींनी सांबराची शिकार करून त्याची शिंगे विक्रीसाठी आणल्याचा संशय आहे. आरोपी जुहू येथील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या व्यक्तींना शिंगे विकण्यासाठी आले होते. पण तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.