Mumbai hit-and-run case: शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्या बीएमडब्लू वाहनाने वरळीतील नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला आज पहाटे मागून जोरदार धडक दिली. या धडकेत बीएमडब्लू चालकाने नाखवा यांच्या पत्नीला खूप दूरवर फरफटत नेले. ज्यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. दरम्यान नाखवा यांनी माध्यमांशी बोलताना अशरक्षः हंबरडा फोडत पत्नीच्या मृत्यूचा शोक व्यक्त केला. अपघात झाल्यानंतर बीएमडब्लू वाहनावरील पक्षाचे नाव आणि चिन्हाचे स्टिकर कुणीतरी काढले, असा आरोप करत नाखवा यांनी राजकारण्यांवर जोरदार आसूड ओढले.
सदर बीएमडब्लू वाहन राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह चालवत असल्याचा आरोप पीडित आणि प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मिहिर शाह अपघातानंतर फरार आहे. तर शाह यांचा चालक वाहन चालवत असल्याचे राजेश शाह यांनी सांगितले आहे. या प्रकरणावरून आता राजकारणही पेटले आहे.
“आमचा पदाधिकारी असला तरी…”, वरळी अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
याच राजकारणादरम्यान नाखवा यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आज पहाटे मी आणि माझी पत्नी दुचाकीवरून मासळी घेऊन जात होतो. ३० ते ३५ च्या वेगाने आम्ही एका बाजूने जात होतो. मागून आलेल्या बीएमडब्लू वाहनाने आम्हाला धडक दिली. धडक बसताच आम्ही गाडीच्या बोनेटवर पडलो. मी तेवढ्यात हात दाखवून चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. चालकाने ब्रेक मारताच आम्ही दोघेही खाली पडलो. मी थोडा बाजूला पडलो, पण दुर्दैवाने पत्नी चाकाखाली आली. तेवढ्यात बीएमडब्लूच्या चालकाने तशीच गाडी दामटवली.”
अपघाताचे वर्णन करत असताना नाखवा यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, “वरळीतील सीजे हाऊस पासून ते वरळी सी लिंकपर्यंत त्या गाडीने माझ्या पत्नीला फरफटत नेले. तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दोन मुलांना टाकून माझी पत्नी गेली. आम्ही मासे विकून आमचा उदरनिर्वाह करत होतो. आता आम्ही जगायचे कसे? आज या पक्षाचे त्या पक्षाचे लोक एकमेकांवर टीका करत आहेत. पण मागून हे आरोपींनाच पाठिंबा देतात. आम्हाला कोण वाचवणार?”
अपघात झाल्यानंतर बीएमडब्लू गाडीवरील पक्षाचे नाव, चिन्ह असलेले स्टिकर काढून टाकण्यात आले आहे, असा आरोपही नाखवा यांनी केला. ही मोठी लोक मागून एकत्र होतात, आम्हाला कुणीही वाली नाही, अशी व्यथा नाखवा यांनी बोलवून दाखविली.
“BMW चालकानं गाडी पळवली नसती तर…”, वरळीतील अपघातावर मनसेच्या संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया
मिहिर शाहची मध्यरात्रीपर्यंत जुहूत पार्टी
नाखवा यांनी आरोप केलेल्या मिहिर शाहने मध्यरात्रीपर्यंत जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केल्याची माहिती मिळत आहे. सदर पार्टीची पोस्ट मिहिरनेच त्याच्या इन्स्टाग्रामवर टाकली आहे. पोलिसांनी आज जुहूमधील त्या बारमध्येही चौकशी केली असून त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. मिहिरने मद्यप्राशन केले होते का? अपघातावेळी बीएमडब्लू वाहन नेमके कोण चालवत होते? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी – आदित्य ठाकरे
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी संवाध साधला. ते म्हणाले, “आज सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. या घटनेतील आरोपी चालक फरार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील जो तरुण आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे.”
“या घटनेतील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला, तरी मी या घटनेचे राजकारण करणार नाही. मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. माझी मागणी आहे की, जो गाडी चालवत होता, त्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप व्हायला नको”, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.