प्रख्यात एन. एम. मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत डमी विद्यार्थी बसून प्रवेश मिळवून देण्याचा अनोखा आणि धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणला. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा आणि सायबर सेलने संयुक्तपणे कारवाई करून ६ जणांना अटक केली आहे. त्यात अभियांत्रिकीचे कोचिंग क्लासेस घेणाऱ्यासह परीक्षेला डमी विद्यार्थी म्हणून बसणाऱ्या एका जॉकीचा समावेश आहे.
‘नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ या महाविद्यालयात एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी ‘एन मॅट’ ही ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय पातळीवरील ही परीक्षा ‘पीअरसन व्ह्य़ू’ या सॉफ्टवेअर कंपनीमार्फत घेतली जायची. या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्यासाठी सहा जणांची एक टोळी सक्रिय होती. ही टोळी ज्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे अशांकडून १५ ते २० लाख रुपये घेत असे. त्या विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थी बसवून मूळ विद्यार्थ्यांला परीक्षा उत्तीर्ण करून देत असे. ही टोळी हुशार तरुणांना डमी विद्यार्थी (जॉकी) म्हणून बसवत असे. हे डमी परीक्षा सहज उत्र्तीण होत, मात्र काही वेळा डमी विद्यार्थीही अनुत्तीर्ण झाले, अशी माहिती सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय (गुन्हे) यांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी पवन कुमार (३६), गजेंद्र प्रताप (२९), हिमांशू शेखर (२८), हनुमंतसिंग गुजर (२९), सुग्रीवसिंग गुजर (३०) यांच्यासह परीक्षेला डमी विद्यार्थी म्हणून बसणाऱ्या आलोक कुमार (३६) या तरुणांना अटक केली आहे. पवन कुमार एमबीए असून, गाझियाबाद येथे अभियांत्रिकीचे कोचिंग क्लासेस घेतो. गुजर बंधू बी. टेक. असून, तेसुद्धा कानपूर आणि झाशी येथे कोचिंग क्लासेस चालवतात. आलोक हासुद्धा बी. टेक. असून, तोही बी. टेक.चे क्लासेस घेतो.

परीक्षा केंद्रावर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांचे छायाचित्र घेत असतो. हे छायाचित्र आणि प्रवेश अर्जावरील छायाचित्र न जुळल्यामुळे आम्हाला हे रॅकेट शोधून काढता आले. ज्या ६९ विद्यार्थ्यांनी या मार्गाने प्रवेश घेतले आहेत, त्यांचे प्रवेश तर आम्ही रद्द करूच; पण, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचाही आमचा इरादा आहे.
– डॉ. राजन सक्सेना,
कुलगुरू, एनएमआयएमएस

असे बसत डमी विद्यार्थी
ऑनलाइन परीक्षेसाठी केवळ पासवर्डची आवश्यकता असते. परीक्षा केंद्रावर हे डमी विद्यार्थी खऱ्या विद्यार्थ्यांचा पासवर्ड घेऊन जात. ते खऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाचे बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड सोबत नेत. त्यामुळे कुणाला संशय येत नसे. संगणकावर पासवर्ड टाकून परीक्षा दिली जात असे. एकूण ६ जॉकींनी गेल्या ३ वर्षांत ८७ विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रवेश मिळवून दिला असल्याची माहिती गुन्हे शाखा ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली.

महाविद्यालयाला कुणकुण लागली..
एमबीए अभ्यासक्रमासाठी ३६० गुणांची लेखी परीक्षा असते. डमी विद्यार्थ्यांना त्यात अडीचशेच्या आसपास गुण मिळत. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत ३० गुणांची असते. ती देण्यासाठी मात्र खरे विद्यार्थी जात. लेखी परीक्षेत उत्तम गुण मिळविणारे विद्यार्थी मुलाखतीत मात्र ढेपाळत असल्याचे महाविद्यालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर महाविद्यालयाने पोलिसांची मदत घेतली आणि बनवाबनवीचा हा प्रकार महिन्याभराच्या तपासानंतर उघडकीस आला. अशा प्रकारे डमी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने २०१३ मध्ये ६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, २६ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत.  २०११ च्या बॅचमधून डमी म्हणून निवडलेले विद्यार्थी उत्र्तीण होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीलाही लागले आहेत.

Story img Loader