केवळ लक्ष वेधून घेण्यासाठीच कन्हैयाने आपण त्याचा गळा दाबल्याचा खोटा आरोप केल्याचे कथित हल्लेखोर मानस ज्योती यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत कन्हैयाने केलेले आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले. मी कन्हैयाला ओळखतो. पण त्याच्यावर हल्ला करण्याचा संबंधच काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कन्हैयावर विमानात हल्ल्याचा प्रयत्न, गळा दाबल्याचा दावा
मानस ज्योती यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीनुसार, ते आणि कन्हैया विमानातील एकाच रांगेमध्ये बसले होते. मानस ज्योती खिडकीकडील सीटवर बसले होते तर कन्हैया रांगेतील शेवटच्या सीटवर बसला होता. मानस ज्योती यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांनी सीटवरून उठताना आधारासाठी कन्हैयाच्या खाद्याला धरल्यावर त्याचा अर्थ कन्हैयाने गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा लावला, असे मानस ज्योती यांनी म्हटले आहे. मी त्याच्यावर हल्ला केलेला नाही. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठीच आपल्यावर खोटा आरोप करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कन्हैयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर कन्हैया आणि मानस ज्योती या दोघांनाही जेट एअरवेजच्या विमानातून खाली उतरविण्यात आले. मानस ज्योती टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते मूळचे कोलकात्यातील असून, कंपनीच्या कामानिमित्त कोलकाताहून मुंबईमार्गे ते पुण्याकडे येत होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा