८६ मंडळांचे अर्ज फेटाळले; ७५७ मंडळांचे अर्ज पडताळणी प्रक्रियेत

प्रसाद रावकर
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या १६ दिवसांवर येऊन ठेपला असून सोमवापर्यंत मुंबईतील केवळ ३०४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी देण्यात आली, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करू न शकलेल्या ८६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी नाकारण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी काही मंडळे चाळी, इमारतीच्या आवारात, खासगी मालमत्तांच्या पटांगणात गणेशोत्सव साजरा करतात, तर काही मंडळे सार्वजनिक मैदाने, पदपथ, रस्त्यावरच मंडप उभारून उत्सव साजरा करतात. मात्र गेल्या वर्षी करोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घातले. या र्निबधांचे मंडळांनी काटेकोरपणे पालनही केले होते. गेल्या वर्षी करोना संसर्गाचा धोका आणि निर्बंध लक्षात घेऊन काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. काही मंडळांनी माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा केला. येत्या काळात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने पुन्हा गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत.

गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी मंडळांना दरवर्षी पालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. मंडप परवानगीसाठी पालिकेने एक खिडकी योजना जाहीर केली असून मंडळांना पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये जाऊन अथवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. यंदा मंडप परवानगीसाठी पालिकेला १,२८८ अर्ज प्राप्त झाले. पडताळणीअंती १४१ मंडळांनी दोन वेळा अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरित १,१४७ मंडळांपैकी ३०४ मंडळांना मंडप परवानगी दिली आहे, तर ८६ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ७५७ मंडळांचे अर्ज विविध पातळ्यांवर प्रक्रियेत आहेत. पडताळणीअंती त्यांनाही परवानगी मिळेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. वर्गणी गोळा करण्यास तसेच जाहिराती झळकाविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मंडळांची आर्थिक कोंडी झाली आहे. अद्याप मंडप परवानगी न मिळाल्यामुळे मंडळांसमोर पेच निर्माण झाला आहे. सध्या मंडप उभारण्यासाठी कामगार मिळत नाहीत. त्यातच गणेशोत्सव जवळ आला आहे. परवानगी लवकर मिळाली तर मंडप उभारणे शक्य होणार आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये सुमारे २,३७५ मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र मार्च २०२० पासून करोनाचा संसर्ग सुरू झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तर काही मंडळांनी आपल्या कार्यालयात उत्सव साजरा केला. त्यामुळे तुलनेत मंडप परवानगीसाठी पालिकेकडे कमी अर्ज आले होते. पालिकेने २०२० मध्ये १७६४ मंडळांना मंडप परवानगी दिली होती.

मंडप परवानगीसाठी आलेल्या अर्जाचा आढावा

  • एकूण अर्ज सादर – १२८८
  • दुबार अर्ज – १४१
  • परवानगी मिळाली – ३०४
  • अर्ज फेटाळले – ८६
  • पडताळणीच्या प्रक्रियेत – ७५७