मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पात अनेक सुविधा देण्याची जाहिरात विकासक करतात. मात्र प्रत्यक्षात त्यातील अनेक सुविधा गृहखरेदीदारांना उपलब्ध करून दिल्या जात नाहीत किंवा त्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. पण आता मात्र विकासकाने नमूद केलेल्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. आता यासाठी महारेराने पुढाकार घेतला आहे. पार्किंगनंतर आता प्रकल्पातील खेळ आणि मनोरंजन यासंबंधीच्या सुविधांचा संपूर्ण तपशील आदर्श विक्री करारात जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संबंधीच्या आदेशाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.
गृहप्रकल्पात तरणतलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, नाट्यगृह, सोसायटीचे कार्यालय, व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट इत्यादी सुविधा देण्यात येणार असल्याचे विकासकांकडून सांगितले जाते. याचा उल्लेखही करारात असतो. मात्र या सुविधांचा सविस्तर तपाशील किंवा त्या कोणत्या तारखेला दिल्या जाणार हे काही नमूद नसते. त्यामुळे प्रत्यक्षात अनेकदा या सुविधा उपलब्ध होत नाहीत किंवा वेळेत उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. ही बाब लक्षात घेत महारेराने प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात, इमारतीत, इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात द्यायच्या आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार ? त्याचा आकार किती असेल ? याचाही तपशील तारखेसह देणे बंधनकारक केले आहे. या प्रस्तावित आदेशासोबत दिलेल्या जोडपत्राच्या मसुद्यानुसार विक्री कराराचा भाग म्हणून देणे आता बंधनकारक असेल. ही तरतूदही अपरिवर्तनीय राहणार आहे.
हेही वाचा : मुंबई: सीएसएमटी येथे लोकल घसरली
सूचना – हरकती नोंदवण्याची संधी
यासंबंधीच्या आदेशाचा मसुदा महारेराकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावर सूचना-हरकती सादर करण्याचे आवाहन महारेराकडून करण्यात आले आहे. २७ मे पर्यंत सर्व संबंधितांना secy@maharera.mahaonline.gov.in या इमेलवर आपल्या सूचना, हरकती नोंदविता येतील.