कुलदीप घायवट
मुंबई आणि उपनगरांतील वाढते प्रदूषण, नैसर्गिक अधिवासाचा विनाश यामुळे सरपटणाऱ्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आहे. बदलत्या निसर्गचक्रात तुलनेने साप स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करतो. मात्र, सापांच्या अनेक प्रजाती अंधश्रद्धा, कर्मकांड, गैरसमज यांच्या बळी ठरल्या आहेत. त्यामधील मांडूळ ही एक प्रजाती. इतर सापांपेक्षा थोडी वेगळी शरीररचना असल्याने त्याची मोठय़ाप्रमाणात तस्करी होते.
दुतोंडय़ा नावाने सर्वपरिचित असलेला मांडूळ हा एक बिनविषारी साप आहे. अजगर व डुरक्या घोणस अशा बिनविषारी सापांचा समावेश ‘बोइडी’ कुळात होतो. त्याचप्रमाणे मांडुळचा समावेश सरीसृप वर्गाच्या ‘बोइडी’ कुलातील ‘एरिक्स’ उपकुळात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव ‘एरिक्स जॉनाय’ आहे. मांडूळ देशभरात सर्वत्र आढळून येतात. मुंबईत झाडाझुडपांच्या, पाणवठय़ाच्या ठिकाणी मांडूळ दिसतात. तसेच वर्दळ कमी असलेल्या, मोडकळीस आलेल्या, अडगळीच्या जागेत ते राहतात.
हेही वाचा >>> सीबीएसई शाळांची संख्या वाढविण्याचा मुंबई महानगरपालिकेचा संकल्प
अजगरासारखे मांडुळाचे शरीर जाड असून पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची लांबी २ ते ३ फूट असते. मादी ही नरापेक्षा लांब असते. मांडूळ जातीच्या सापाला दोन तोंडे असतात, असा गैरसमज आहे. या सापाची शेपटी बोथट, जाड व आखूड असते. इतर सापाप्रमाणे शेपटीचे निमुळते टोक नसते. त्यामुळे मांडुळाची शेपटी आणि डोके सारखेच असल्याचे भासते. त्यामुळेच त्याला दुतोंडय़ा म्हणून ओळखतात. त्याला विदर्भात माटीखाया, गोव्याच्या परिसरात मालण म्हणतात. या सापाच्या शरीराच्या वरच्या भागाचा रंग मातकट किंवा काळा आणि तकतकीत असतो. त्याच्या डोक्यापासून ते शेपटीपर्यंत पाठीवरील आणि पोटाकडील खवले लहान व एकसारखे असतात. डोक्यावरील खवले किंचित मोठे असतात. डोळे बारीक असून बाहुल्या उभ्या असतात. ऑगस्ट-सप्टेंबर हा त्यांचा प्रजनन काळ असतो. पिल्लांचा रंग लालसर तपकीरी असतो आणि त्यावर काळे पट्टे असतात. पिल्लू मोठे होते तसे पट्टे दिसेनासे होत जातात.
हेही वाचा >>> जुन्या इमारतींचा पुनर्विकास: उपनिबंधकांच्या अहवालासाठी ठराविक रक्कम जमा करण्याची सक्ती?
मांडूळ हा भुसभुशीत मातीत किंवा बिळात राहतो. कोरडय़ा जागी ते राहतात. हा साप निशाचर असून मानवासाठी अत्यंत निरुपद्रवी असतो. उंदीर, घुशी, सरडे, खारी यांसारखे प्राणी त्याचे भक्ष्य आहेत. त्यामुळे मांडूळ हा शेतकऱ्यांसाठी मित्र मानला जातो. या प्राण्यांना घट्ट विळखा घालून त्यांना अखंड गिळतो. मुळात इतर सापांसारखा हा साप चपळ नाही. मंदगतीने तो सरपटतो. वेटोळे करून डोके जमिनीत खुपसून शेपूट वर ठेवतो व शेपटीची हालचाल करतो. मात्र अनेक गैरसमजुतीमुळे त्याची तस्करी होते किंवा त्याला मारले जाते. मांडूळ साप घरात ठेवल्यास भरभराट, धनप्राप्त होते. त्याची पूजा केल्यास तो गुप्तधन शोधून देतो, अशी अंधश्रद्धा समाजात आहेत. त्या कायम राखण्यात अनेक मांत्रिकाचा हातभार आहे. भारतातून चीन व जपान या देशांमध्ये मोठय़ाप्रमाणात मांडूळाची तस्करी केली जाते. औषध निर्मितीसाठीही त्याचा वापर होत असल्याचा बनाव केला जातो. त्याचबरोबर त्यांच्या कातडीसाठीही त्याची हत्या आणि तस्करी होते. मांडूळाला चांगली किंमत मिळते. त्यामुळे त्याच्या तस्करीचे प्रमाण अधिक आहे. मांडूळाला १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची तस्करी करणाऱ्यांवर शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र, तरीही त्यांची तस्करी पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही.