लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कफ परेड परिसरातील मेकर टॉवर येथे मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी करुन विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीतील चार जणांना कफ परेड पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे.
कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकर टॉवरजवळ सोमवारी मांडूळ प्रजातीच्या सापाची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती कफ परेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने मेकर टॉवर परिसरात सापळा रचला होता. प्राप्त माहितीनुसार एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील बाजूस ठेवलेल्या एका बॅगची तपासणी करताना त्यात ५ किलो वजनाचा व ५५ इंच लांबीचा मांडूळ साप आढळून आला. सापाला ‘आरे की फाउंडेशन’चे सर्पमित्र गणेश गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आणखी वाचा-व्यथा पोलिसांच्या : घर व सेवा वसाहतींचा प्रश्न रखडलेला
बदलत्या निसर्गचक्रात तुलनेने साप स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करतो. मात्र, सापांच्या अनेक प्रजाती या अंधश्रद्धा, कर्मकांड, गैरसमज यांच्या बळी ठरल्या आहेत. त्यातील मांडूळ ही एक प्रजाती. इतर सापांपेक्षा थोडी वेगळी शरीररचना असल्याने त्याची मोठय़ाप्रमाणात तस्करी होते. दुतोंडय़ा नावाने ओळखला जाणारा मांडूळ बिनविषारी साप आहे. मुंबईत झाडाझुडपांच्या, पाणवठय़ाच्या ठिकाणी मांडूळ दिसतात. अजगरासारखे मांडुळाचे शरीर जाड असून पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची लांबी २ ते ३ फूट असते. मांडूळ जातीच्या सापाला दोन तोंडे असतात, असा गैरसमज आहे. मांडुळाची शेपटी आणि डोके सारखेच दिसते. त्यामुळेच त्याला दुतोंडय़ा म्हणूनही ओळखतात. मांडूळ निशाचर असून मानवासाठी अत्यंत निरुपद्रवी असतो. उंदीर, घुशी, सरडे, खारी यांसारखे प्राणी त्याचे भक्ष्य आहेत. त्यामुळे मांडूळ हा शेतकऱ्यांसाठी मित्र मानला जातो.
आणखी वाचा-गोवंडीतील शिवाजी नगरमधील हवा आजही ‘वाईट’, वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढले
दरम्यान, अनेक गैरसमजुतींमुळे मांडूळाची तस्करी केली जाते किंवा त्याला मारले जाते. मांडूळ साप घरात ठेवल्यास भरभराट होते, धनप्राप्त होते. त्याची पूजा केल्यास तो गुप्तधन शोधून देतो, अशा अंधश्रद्धा आहेत. त्या कायम राखण्यात अनेक मांत्रिकाचा हातभार आहे. भारतातून चीन व जपान या देशांमध्ये मोठय़ाप्रमाणात मांडूळाची तस्करी केली जाते. औषध निर्मितीसाठीही त्याचा वापर होत असल्याचा बनाव केला जातो. त्याचबरोबर त्यांच्या कातडीसाठीही त्याची हत्या आणि तस्करी होते. मांडूळाला लाखो रुपयांची किंमत मिळते. त्यामुळे त्याच्या तस्करीचे प्रमाण अधिक आहे. मांडूळाला १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची तस्करी करणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र, तरीही त्यांची तस्करी पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही.