— सुशांत मोरे
होळीच्या दिवशी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकण व मध्य रेल्वेच्या गलथान कारभाराचा मोठा फटका बसला आहे. कोकणात वेळेत पोहोचता येईल यासाठी सकाळीच मुंबईतून निघालेल्या प्रवाशांना तीन तास उशीराने धावत असलेल्या मांडवी एक्सप्रेसमुळे वेळेत पोहोचता आले नाही, एकूणच त्यांचे मोठे हाल झाले.
कोकणातून मुंबईत येणारी एक्सप्रेस उशीराने पोहोचली आणि त्यामुळेच मुंबईतून पुन्हा परतीचा प्रवास करताना मांडवी एक्सप्रेसला लेटमार्क लागल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बुधवारी सीएसएमटी येथून सकाळी ७.१० वाजता सुटणारी १०१०३ मांडवी एक्सप्रेस सकाळी ८.५० वाजता सुटली. त्यानंतर पुढील प्रवास आणखी लांबत गेला. ठाणे व त्यापुढील स्थानकात तर ट्रेन उशीराने धावत असल्याची उद्घोषणा अधूनमधून केली जात होती. मात्र, त्या त्या स्थानकांत कधी पोहोचेल आणि नेमके कारण काय याची माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे होळीसाठी कुटुंबासह कोकणात जाणाऱ्याचे हाल झाले.
सकाळी ११.३० वाजता खेड स्थानकात पोहोचणारी ही गाडी दुपारी अडीच वाजता पोहोचेल अशी माहिती उपलब्ध होत होती. कोकणातून मुंबईत येणारी कोकणकन्या एक्सप्रेस ही सकाळी मांडवी एक्सप्रेस म्हणून धावते. परंतू कोकणातून मध्य रेल्वेच्या ताफ्यात येण्यास या गाडीला उशीर झाला आणि त्यामुळे मांडवी उशीराने धावत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, महिन्यातून अनेकदा मांडवी एक्सप्रेसला ही समस्या येऊ लागली आहे. मुंबईतून कोकणात जाताना किंवा कोकणातून मुंबईला येताना रेल्वे प्रशासनाच्या ताफ्यात ही गाडी काही कारणामुळे उशिरा प्राप्त होते आणि त्यामुळेच प्रवास उशिराने होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.