मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात येणार आहे. परिणामी, गेल्या किमान सहा – सात महिन्यांपासून या प्रस्तावावरून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आता या जलाशयाची दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, आययटी रुरकीच्या तज्जांनी जलाशयाची पाहणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल लवकरच सादर होणार असून त्यानंतर सात दिवसांत प्रस्ताव रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

मलबार हिल येथील १३६ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद गेल्या काही महिन्यांपासून चिगळला आहे. या कामासाठी ३८९ झाडे कापावी किंवा पुनर्रोपित करावी लागणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी, पर्यावरणवाद्यांनी झाडे हटवण्यास विरोध केला होता. तसेच या कामामुळे हँगिंग गार्डन काही वर्षे बंद ठेवावे लागणार होते. त्यामुळे नागरिकांनी जलाशयाच्या पुनर्बांधणीला विरोध केला होता. परिणामी, जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले होते. याबाबत निर्णय घेण्यासाठी पालिकेने मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांसह एक समिती नेमली होती. मात्र आठ जणांच्या समितीने परस्परविरोधी असे दोन अहवाल दिले होते. त्यामुळे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आयआयटी रुरकीच्या प्राध्यापकांची मदत घेतली आहे. रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्राध्यापकांनी नुकतीच मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी केली. त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.

दरम्यान, आयआयटीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला तरी संपूर्ण जलाशय तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल आल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव रद्द केला जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलाशयाची दुरुस्ती करायची झाल्यास ती कशी करावी, त्यावेळी पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे करावे याबाबतही तज्ज्ञांनी अहवाल देणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>आशियातील पहिल्या महिला रेल्वेचालकांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण

पार्श्वभूमी

संपूर्ण दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये मांडला होता. मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री आणि दक्षिण मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नागरिकांची बैठकही बोलावली होती. तसेच नागरिकांची एक समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने एक पुनर्विलोकन समिती स्थापन केली. पालिकेने आय.आय.टी.- पवईचे चार प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी अशा आठ सदस्यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. पालिकेने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयाची डिसेंबर महिन्यात अंतर्गत पाहणी केली. जलाशयाची पुनर्बांधणी करायची की दुरुस्ती करायची या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित होते. त्यानुसार या समितीतील चार तज्ज्ञांनी आपला अंतरिम अहवाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पालिका आयुक्तांना सादर केला होता. पालिका प्रशासनाने या तलावाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र तज्ज्ञांच्या समितीने आपल्या अहवालात पुनर्बांधणीचा मुद्दा फेटाळत किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ही दुरुस्ती तातडीने करण्याची गरज नसल्याचेही अहवालात म्हटले होते. तसेच जलाशय सुस्थितीत असून योग्य देखभाल केल्यास पुढील अनेक वर्षे तो सुस्थितीत राहील, असेही यात म्हटले होते. अन्य चार सदस्यांमध्ये भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी) मुंबईचे तीन सदस्य व पालिकेचे उपायुक्त यांचा समावेश होता. त्यांनी तज्ज्ञ समितीच्या चर्चेच्या आधारे तसेच, सर्व पैलुंचा विचार करून, मुंबईकर नागरिकांकडून प्राप्त झालेली पत्रे व ई-मेल आदी विचारात घेवून आपला अहवाल मार्च २०२४ मध्ये पालिका आयुक्तांकडे सादर केला. यामध्ये आयआयटीचे प्राध्यापक आर. एस. जांगिड, प्रा. व्ही. ज्योतिप्रकाश, प्रा. दक्षा मूर्ती आणि पालिकेचे उपायुक्त सी. एच. कांडलकर यांचा समावेश होता. या चार सदस्यांनी सादर केलेल्या अहवालाला इतर चार सदस्यांनी सहमती न दर्शवल्यामुळे त्यांनी या अहवालावर स्वाक्षरी केली नव्हती. आठ सदस्यांच्या समितीमध्ये दोन वेगवेगळे अहवाल दिल्यामुळे या विषयावरील गुंता अद्याप कायम आहे. आयआयटीच्या सदस्यांनी पर्यायी जलाशय बांधून, मग सध्याचा जलाशय रिकामा करून त्याची दुरुस्ती व संरचनात्मक तपासणी करण्याची शिफारस केली होती. मात्र अन्य चार सदस्यांना ही शिफारस मान्य नसल्यामुळे अंतिम अहवालानंतरही या विषयाचा गुंता कायम होता. त्यामुळे पालिकेने गेल्या आठवड्यात रुरकी आयआयटीच्या तज्ज्ञांना पाहणीसाठी बोलावले होते.

मुंबई शहरात आपल्या हातात उरलेल्या मोकळ्या जागांपैकी हँगिंग गार्डन ही एक महत्त्वाची जागा आहे. या जागेचा वापर करणाऱ्या नागरिकांचा आणि त्या ठिकाणी असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आपण आदर करायला हवा. येथील झाडांची कत्तल न करता जलाशयाची दुरुस्ती होऊ शकते. त्यासाठीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी निवडलेली निविदा रद्द करण्यास पत्राद्वारे सांगितले आहे.- मंगलप्रभात लोढा, उपनगर जिल्हा पालकमंत्री