Girgaon Marathi Marwari Conflict: “भाजपाची सत्ता आली आहे, आता इथे मारवाडीत बोला, मराठी चालणार नाही”, असे विधान गिरगावमधील खेतवाडी येथील एका अमराठी दुकानदाराने केले होते. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटलेले पाहायला मिळत आहेत. दुकानदाराने ज्या मराठी महिलेला भाषेवरून हटकले होते. त्या महिलेने याची तक्रार स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. पण लोढा यांनी आपली तक्रार ऐकून घेतली नाही, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप सदर महिलेने एका व्हिडीओद्वारे केला होता. त्यानंतर महिलेने मनसेकडे याची दाद मागितली आणि मनसेने सदर दुकानदाराला चोप देत माफी मागण्यास भाग पाडले. यानंतर आता आमदार मंगल प्रभात लोढा यांनी यावर उत्तर दिले आहे.
भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध
मंगल प्रभात लोढा यांनी एक्स या साईटवर पोस्ट टाकत उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध! मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे!
त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे! भाजपाचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत! आपली मुंबई सर्वांची आहे!, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे.
जाहीर निषेध!”
दरम्यान, या विषयावर आता सोशल मीडियावर जोरदार वादंग उठले आहे. मनसेने या प्रकरणाची दखल घेऊन सदर महिलेची मदत केल्याबद्दल नेटिझन्स मनसेचे आभार मानत आहेत. तर आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सुरुवातीला महिलेची तक्रार घेतली नसल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
अमिगो नावाच्या एका एक्स अकाऊंट युजरने म्हटले, “आता व्हायरल होत आहे म्हटल्यानंतर लगेच सारवासारव करायला आलात?? जी बाई व्हिडिओमध्ये आहे की तुमच्याकडे आली होती. You did not entertain her. तुम्हा सर्वांना एकदा सणसणीत धडा शिकवायलाच हवा.”
विजय नावाच्या अकाऊंटवरूनही अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे. “याची सर्व मराठी माणसांनी सवय करून घ्यावी. हिंदी बोला म्हटल्यावर राग येत नाही ना मग मारवाडीने काय घोड मारलं आहे? हिंदी सोबत गुजराती, मारवाडी शिकून घ्या, तसही मराठी आता अल्पसंख्य झाले आहेत. आपली भाषिक अस्मिता इतकी पातळ झाली आहे की कुणीही येत आणि आपल्याला टपली मारून जातय”, अशी टिप्पणी विजय या अकाऊंटवरून करण्यात आली.