मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात सुरु केल्यामुळे यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनीही लोढा यांना कार्यालय देण्यास विरोध केला आहे. हुकूमशाही पद्धतीने घुसखोरी केल्याचा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे केला आहे
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “आम्ही मंत्री असताना महापालिकेत बैठका घेतल्या. मात्र, कुठेही असे कार्यालय हडपले नाही. हे थांबले आणि बदललं पाहिजे. नाहीतर मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौरांना कार्यालय दिलं पाहिजे. पालमंत्र्यांच्या कार्यालयात भाजपाने माजी नगरसेवक बसले होते. अन्य राजकीय पक्षांची कार्यालय बंद करायला लावली. आता हुकूमशाहीपद्धतीने घुसखोरी सुरु आहे. हे २४ तासांत थांबलं पाहिजे. अन्यथा याचा राग मुंबईकर कधी ना कधीतरी व्यक्त करतील.”
हेही वाचा : “पंतप्रधान मोदी ‘मणिपूर फाइल्स’ हा चित्रपट…”, ठाकरे गटाचा थेट सवाल
यावर मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिलं आहे. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “हे दालन मला दिलेले नसून पालकमंत्रीपदाला दिले आहे. शहर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही दालन द्यावे, अशीही आमची मागणी आहे. उपनगर जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपनगरात जनता दरबारांचे आयोजन करण्यात आले होते.”
“मात्र, यापैकी बहुसंख्य नागरिकांची कामे पालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावल्यानंतर त्यांचा वेळ वाया जातो. त्यापेक्षा इथून काम केले तर त्यांचा वेळ वाचेल,” असे लोढा यांनी सांगितले.
हेही वाचा : “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”, आमदार अमोल मिटकरींचं ट्वीट चर्चेत
दरम्यान, “मुंबईतील नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी महापालिकेत कार्यालय उपलब्ध करावे, असे पत्र पालकमंत्री लोढा यांनी १५ दिवसापूर्वी दिले होते. त्यांच्या मागणीमुळे हे दालन उपलब्ध करून देण्यात आले,” अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.