गिरण्यांच्या चिमण्या थंडावल्या असल्या तरी आजही मंगलदास बाजारातील राबता कायम आहे. मात्र कपडय़ांच्या व्यवसायातील दिवसागणिक वाढणाऱ्या आव्हानांमुळे या व्यापाऱ्यांची चौथी, पाचवी पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक दिसत नाही. तरीही या मार्केटचा ‘मॉल’ कधी होईल, याकडे डोळे लावून येथील व्यवहार सुरूच असतात.
साधारण दीडशे वर्षांपूर्वी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली. त्यावेळी या गिरण्यांमध्ये तयार केलेला माल तेथेच विकला जावा यासाठी ब्रिटिशांनी क्रॉफर्ड मार्केटजवळच एक बाजारपेठ बांधली. मुंबईतील या बाजारपेठेत दररोज हजारो मीटर कापड विकले जाई. हे घेण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून व्यापारी येत असत. मात्र कालांतराने गिरणगाव उद्ध्वस्त होत गेले आणि मुंबईतील गिरण्या बंद झाल्या आणि लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. गिरण्यांच्या चिमण्या थंडावल्या असल्या तरी आजही या बाजारातील राबता कायम आहे. दुसऱ्या राज्यातून आलेला माल विकण्याची प्रथा येथे सुरू झाली आणि ती आजतागायत कायम आहे. गिरणगाव बहरण्याच्या व उद्ध्वस्त काळाचा साक्षीदार असलेली या मंगलदास बाजारातील ब्रिटिशकालीन इमारतीत गेल्या अनेक दशकात काहीच बदल झालेला नाही. तेथे फिरताना बाजाराची संरचना, दुकानदार आणि ग्राहकामधील व्यवहार तुम्हाला गिरण्यांच्या काळात चाललेल्या व्यापाराची आठवण करून देईल.
मुंबईत अनेक ठिकाणी कपडय़ांची घाऊक बाजारपेठ आहे. मात्र मंगलदास मार्केटमध्ये मिळणारी विविधता इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. छत्रपती शिवाजी स्थानकापासून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर ही बाजारपेठ सुरू होते. या बाजारपेठेला एकूण १७ प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारांवर िहदी आणि गुजराती भाषेत मंगलदास मार्केट असे लिहिण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी या मार्केटवर दहशतवाद्यांची नजर असल्याचे म्हटले जात होते. त्या काळात येथील मुख्य प्रवेशद्वारापाशी सुरक्षारक्षक नेमण्यात आले. मात्र इतर द्वाराजवळ ही सुविधा करण्यात आली नव्हती. या मार्केटमध्ये घाईघाईने आत शिरलेला ग्राहक त्याच दारातून बाहेर येईल याची शक्यता तशी कमीच. मंगलदास मार्केटचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची संरचना. या बाजाराला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असे असताना याची संरचना मात्र आजही मजबूत आहे. या बांधकामासाठी सागाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे आणि या बाजारात फिरताना तुम्हाला कधी उकाडा जाणवत नाही. बाजाराचे बांधकाम उंचावर असल्याने येथे हवा खेळती राहते.
बाजारात प्रवेश केल्यानंतर समोर असलेल्या पाटीवर लिहिल्याप्रमाणे तुम्ही कोणत्या लेनमध्ये आहात हे लक्षात येते. बाजारात एकूण ९ लेन अर्थात गल्ल्या आहेत. बाजारात फिरताना कुठले दुकान राहू नये यासाठी पहिल्या लेनपासून खरेदीची सुरुवात केली तर संपूर्ण मार्केट नीट बघता येते. प्रत्येक दुकानाजवळ गेल्यावर दुकानदार तुमची चांगली विचारपूस करतो. तुमच्या कपडय़ाच्या व वागण्याच्या पद्धतीवरून तुम्ही मराठी की िहदी भाषिक आहात याचा अंदाज घेतो. आणि त्यानुसार त्या त्या भाषेत तुमच्याशी संवाद साधू लागतो. नृत्य, गाणं याप्रमाणेच आपल्याजवळील वस्तू विकणे ही देखील एक कला आहे असे वाटावे, इतक्या सहज ते आपल्याकडील वस्तू तुम्हाला विकतात. येथे प्रत्येक प्रकारातील कपडे पाहता येतील. दाक्षिणात्य पद्धतीतील कांजीवरम, महाराष्ट्रीयन जरीकाठ, गुजराती बांधणी अशा वेगवेगळ्या प्रकारातील पंजाबी सूट, कुरते, ड्रेस मटेरियल येथे विकले जातात. यामध्येही बदलत्या फॅशननुसार वैविध्य असते. सध्या सर्व बाजारांमध्ये गुडघ्याखालील कुडत्यांची फॅशन सुरू आहे, त्यामुळे या बाजारावरही त्याचा परिणाम दिसतो. त्याशिवाय कॉटन, सिल्कमधील पल्लाझोही सध्या महिलांची पसंती ठरत आहे. त्याशिवाय फुलकारी, आरी नेट, ज्युट, बनारसी, आसाम सिल्क या प्रकारातील दुपट्टे या बाजाराचे खास आकर्षण आहे. या दुपट्टय़ाच्या किमती १००० ते १५०० रुपयांपर्यंत आहे. ड्रेस मटेरियलच्या किमतीही ३५० रुपयांपासून सुरू होतात. त्या किमती अगदी ५ ते ८ हजारापर्यंतही असतात. महिलांबरोबरच येथे पुरुषांच्या कपडय़ांचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. शर्ट व विजार यांचे कापड अगदी ३५० रुपयांपासून सुरू होतात. हवे असल्यास मोठे ब्रॅडचे कापडही येथे उपलब्ध होते. येथे मिळणारे कपडे स्वस्त दरात असल्याने लग्नसमारंभाची खरेदी, भेटवस्तू देण्यासाठी येथे येणारया ग्राहकांची संख्या अधिक आहे. येथे येणारा ग्राहक हा अगदी मुंबई, मुंबई उपनगरातून येतो. अनेकदा विविध जिल्ह्य़ातूनही मोठय़ा संख्येने ग्राहक खरेदी करण्यासाठी येतात.
या बाजारात ९ लेनमध्ये साधारण १०० दुकाने विभागली आहेत. पूर्वी येथे बहुतांश गुजराती व्यापारीवर्ग होता. मात्र बदलत्या काळानुसार येथे मुस्लीम, मराठी, उत्तर भारतीय या समाजातील व्यापाऱ्यांनीही येथे बस्तान बसवले. तरीही आजदेखील या बाजारात गुजराती समाजाचे प्राबल्य आहे. एका दुकानात ३ ते ४ कामगार कपडे विकण्याचे काम करतात. या कर्मचाऱ्यांमध्ये मराठी माणसांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसते.
या बाजारात येणारा माल हा अहमदाबाद, सुरत, ओरिसा या भागातून येतो. तेथून घेतल्यानंतर साधारण दुपटीने माल ग्राहकाला विकला जातो. मात्र आता ग्राहकही दक्ष झाले असल्याने दुकानदाराने मालाची किंमत सांगितल्यानंतर त्याच्या अध्र्या किमतीपासून भाव करायला सुरुवात करतात. अशावेळी ग्राहक व दुकानदारामधील संवाद खूप रंजक असतो. सण-उत्सवात येणारा ग्राहक तर दुपटीने वाढतो. काही वर्षांपूर्वी घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार दरदिवसाला मंगलदास मार्केटमध्ये ५० हजारांहून अधिक ग्राहक येत असल्याचे स्पष्ट झाले होते. नोटाबंदीनंतरच मंगलदास मार्केटमध्ये कित्येक दिवस शुकशुकाट होता. इतका की त्या महिन्यात येथे क्रिकेट खेळता येईल, इतकी मोकळीक होती, असे येथील दुकानदार सांगतात. ‘ऑनलाइन शॉपिंग’ आणि ‘मॉल’मधील खरेदीचे प्रस्थ वाढल्याने येथील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मात्र, आजही जुने ग्राहक मंगलदास मार्केटमध्ये चक्कर मारतातच. सध्या या बाजारातील दुकानांची कमाई दिवसाला साधारण ३० ते ५० हजारापर्यंत असते. काही दुकानात तर हा गल्ला लाखापर्यंतही जातो. दिवसाला काही कोटींची उलाढाल या बाजारात होत असते. मात्र कपडय़ांच्या व्यवसायातील दिवसागणिक वाढणाऱ्या आव्हानांमुळे या व्यापाऱ्यांची चौथी, पाचवी पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक दिसत नाही. दुकान चालविण्यास कोणी नसल्याने अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने भाडय़ाने दिली आहेत, तर अनेकांनी ती केव्हाच विकली आहेत. मॉलचे विश्व केव्हा आपले अस्तित्व कवेत घेईल या विचाराने या दुकानदारांच्या कित्येक रात्री झोपेशिवाय गेल्या असतील, नाही का?
मीनल गांगुर्डे @MeenalGangurde8