संत ज्ञानेश्वर, कवी केशवसुत, रविकिरण मंडळ, बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतर काव्यसंपदा समृद्ध करण्यात दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांचा मोठा वाटा होता. पाडगावकर हे प्रयोगशील कवी होते, त्यांचा हा लौकिक पुढील काळातही कायम राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी नुकतेच मुंबईत केले.
कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाडगावकर आदरांजली सभेत ते बोलत होते. पाडगावकर यांच्या कविता आतून उमटत असत, अशा शब्दांत कर्णिक यांनी पाडगावकर यांच्या कवितांचा गौरव केला. मराठी संशोधन मंडळाचे संचालक प्रदीप कर्णिक यांनी पाडगावकर यांच्या कवितांविषयी विवेचन केले तर ‘कोमसाप’चे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी प्रभादेवी येथील ‘किस्मत’ चित्रपटगृहाच्या चौकास पाडगावकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. या वेळी काही कवींनी पाडगावकर यांच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कपिले यांनी केले तर अर्चना आढावकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी पाडगावकर यांची काही गाणी सादर केली.