अनेक अजरामर कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश केशव पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाडगावकर यांच्या पार्थिवावर शीव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. पाडगावकरांच्या जाण्याने मराठी साहित्य वर्तुळात तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. पाडगावकरांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. गेल्या ७० वर्षांपासून ते कविता लिहित होते.
अखेरचा ‘सलाम’!
पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए’ झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षे महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काम केले होते. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षे पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले.
युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस-युसीस येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर १९८९ मध्ये ते निवृत्त झाले.
६० आणि ७० च्या दशकात पाडगावकर, ‘ज्ञानपीठ’ विजेते कवी विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाले. पाडगावकर यांनी लिहिलेली ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही गाणीही खूप गाजली. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविताही विशेष गाजली होती.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची साहित्य संपदा
दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पाडगावकर अध्यक्ष होते. उतार वयातही त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००८ मध्ये त्यांना राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८० मध्ये त्यांच्या सलाम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
पाडगावकर यांची काव्यसंपदा
‘धारानृत्य’हा पाडगावकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगावकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ कवीवर्य बा. भ. बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी भावकाव्य शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखन सुरु केले.
‘जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३),
‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
पाडगावकर यांनी ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली. सत्तेच्या संपर्कात राहणाऱ्या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला. १९६० नंतरच्या वास्तवावर भेदकपणे प्रकाश टाकणारी पाडगावकर यांची कविता नवसमृद्ध वर्गाची, त्याच्या संवेदनाहिन मनाची चिरफाड करुन वाचकांना अंतर्मुख करते.
‘बोलगाणी’ हा पाडगावकर यांनी काव्यरचनेवर केलेला एक वेगळा प्रयोग आहे. मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले होते. पाडगावकर यांनी ‘भोलानाथ, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
१९६४ मध्ये प्रकाशित झालेला ‘वात्रटिका’हा त्यांचा कवितासंग्रह पाडगावकर यांची एक वेगळी ओळख करुन देणारा ठरला आहे.
पाडगावकर यांचे ललित लेखन व संपादित साहित्य
१९५३ मध्ये पाडगावकर यांचा ‘निंबोणीच्या झाडामागे’हा ललितलेख निबंधसंग्रह प्रकाशित झाला होता. ‘बोरकरांची कविता’, ‘विंदा करंदीकर यांची निवडक कविता’ हे त्यांनी संपादित केलेले काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत.
‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातील कवितांमधू्न दिसणारा निसर्ग व प्रेम त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या सारख्या भावगीतांमधून अधिक तरलपणे व्यक्त झाला होता. काही वर्षांपूर्वी पाडगावकर यांनी ’बायबल’ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
२००८ मध्ये पाडगावकर यांना राज्यातील प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते...
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 30-12-2015 at 09:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh padgaonkar passes away