लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंधेरीमधील रहिवाशांनी आपल्या मागण्याचा जाहीरनामा तयार केला असून निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना हा जाहीरनामा दिला जाणार आहे. खासदार निधी हा नागरिकांच्या हिताच्या कामासाठी वापरावा, सुशोभिकरणासाठी वायफळ खर्च करू नये, अशी महत्त्वपूर्ण मागणी या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीला आता केवळ १९ दिवस उरले असून सर्वच प्रमुख पक्षांनी अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. वायव्य मुंबईत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरवले आहेत. दोन्ही उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता अंधेरी परिसरातील अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेने (लोका) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहिरनामा उमेदवारांना देण्यात येणार असून त्यांच्यासोबत रहिवाशांची एक बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे धवल शाह यांनी दिली.

आणखी वाचा-नऊ महिन्यात मुंबईत तिसऱ्या आरोपीची आमहत्या, कोठडीतील सुरक्षेबाबत प्रश्न

अंधेरी पश्चिम परिसरातील लोखंडवाला, वर्सोवा, ओशिवरा, यारीरोड अशा उच्चभ्रू परिसरातून सर्वात जास्त मालमत्ता कर भरण्यात येतो. तसेच सर्वात जास्त करदाते या भागात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना तशा सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली. या भागातील अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत, ते पूर्ण करावे अशी मागणी या जाहिरनाम्यात करण्यात आली आहे. गोखले पूल, ठाकरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, मृणाल गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, यारी रोड पूल, वर्सोवा – मढ पूल, ओशिवरा नदीवरील पूल, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता हे प्रकल्प पूर्णत्वाला न्यावे, तसेच ज्यांच्यामुळे हे प्रकल्प रखडले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

या परिसरात पावसाचे पाणी तुंबत असल्यामुळे मोगरा उदंचन केंद्राचे काम लवकर सुरू करावे, कचरा वर्गीकरण केंद्र बंदिस्त करावे, रस्त्याच्या कामादरम्यान जलवाहिन्या फुटू नयेत म्हणून उपाययोजना कराव्या, चित्रकूट परिसरात नवीन अग्निशमन केंद्र उभारावे आदी मागण्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई : कर्णबधिरांसाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती

खासदार निधीचा वापर करताना लोकांच्या सूचना विचारात घ्याव्यात व त्यानुसार खासदार निधीचा विनियोग करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात मुंबईत आमदार निधीतून मोठ्या प्रमाणावर सुशोभिकरणाची कामे करण्यात आली. त्याच धर्तीवर सुशोभिकरणावर खासदार निधीचा वायफळ खर्च करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच एकदा निवडून आल्यावर भावी खासदारांनी रहिवाशांना वेळ द्यावा, उपलब्ध राहावे, दर तीन महिन्यांनी नागरिकांशी चर्चा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manifesto of the residents of north west mumbai do not waste money on beautification mumbai print news mrj
Show comments