आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या यवतमाळ मतदारसंघात २ जूनला पोटनिवडणूक होणार असून, काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मुलगा तेथून उभा राहण्यासाठी इच्छुक आहे.
येथे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ८ ते १५ मेपर्यंत आहे. पारवेकर यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी असली तरी त्यांची पत्नी निवडणूक लढविण्यास फारशी उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते पारवेकर यांच्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहेत. गेल्या वेळी यवतमाळ मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांनी स्वत:साठी उमेदवारी मागितली होती. पण प्रदेशाध्यक्षपदी असल्याने त्यांच्या नावाचा विचार झाला नव्हता. यंदा प्रदेशाध्यक्षांचे पुत्र आणि यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे हे उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. यवतमाळ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने पक्षातील अनेक जण उमेदवारीकरिता इच्छुक आहेत.