माणिकराव ठाकरे यांच्याकडून चौकशीची मागणी
मानखुर्द येथील चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या गतिमंद बालगृहात गेल्या दीड महिन्यात झालेल्या गतिमंद मुलांच्या मृत्यूला महिला व बालकल्याण विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला असून या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. ‘लोकसत्ता’ने गतिमंद मुलांच्या मृत्यूचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर ठाकरे यांनी तात्काळ या बालगृहाला भेट दिली.
मुंबईसारख्या शहरातील गतिमंद बालकांच्या वसतिगृहाची अवस्था भीषण असून या मुलांना कोठडीत ठेवल्यासारखे चित्र मला दिसले. या मुलांना औषधांची मोठय़ा प्रमाणात गरज असताना त्यांना शासनाकडून पुरेशी औषधे पुरवली जात नाहीत. सामाजिक संस्था व दानशूर लोकांच्या देणग्यांमधून औषधे तसेच अन्नधान्य उपलब्ध होत असून येथे गतिमंद मुलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच येथे कर्मचारी वर्ग अपुरा असून या मुलांची परिस्थिती भयावह असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईसारख्या राजधानीच्या शहरात ही स्थिती असेल, तर अन्य वसतिगृहांत काय असेल, असा सवालही त्यांनी केला. या साऱ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्याचेही त्यांनी सांगितले. मनसे तसेच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या बालगृहाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहाणी केली. या संस्थेचे गेल्या दोन वर्षांत लेखापरीक्षणही झालेले नसून या संस्थेची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे कागदोपत्री दिली असली त्याचे हस्तांतरणही गेल्या दोन वर्षांत झालेले नाही. गंभीर बाब म्हणजे मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या या संस्थेवर गेल्या वर्षांत गव्हर्निग कमिटी नेमण्यासाठीही शासनाला वेळ मिळाला नसल्याने या बालकांच्या आरोग्याची कमालीची हेळसांड होत असल्याचे येथील कामगार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी सांगितले.
येथील गतिमंद मुलांच्या आरोग्याची तपासणी बीएएमएस डॉक्टरांकडून करणे हीच क्रूर चेष्टा असल्याचा आरोप तुळसकर यांनी केला असून या मुलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीच नेमणूक होणे आवश्यक असताना ती आजपर्यंत का केली गेली नाही याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.