मणिपूरमधील तरुणीचा अज्ञात व्यक्तीने मुंबईत दिवसाढवळ्या विनयभंग करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कलिना परिसरात गेल्या शनिवारी ही घटना घडली. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र, माध्यम प्रतिनिधींनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित तरुणी गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहे. शनिवारी संध्याकाळी आपल्या मैत्रिणीसोबत ती कलिना परिसरात फिरत असताना ही घटना घडली. कलिना परिसरातील पाम व्हिला सोसायटी परिसरातून जात असताना अज्ञात व्यक्ती या तरुणीच्या दिशेने थुंकला. ज्यावेळी तिने या प्रकाराचा जाब विचारला आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तिने पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीच्या पोटात जोरात लाथ मारली. ती खाली पडल्यावर आरोपीने तिचे केस पकडून तिला उठवले. यावेळी परिसरातील कोणत्याही व्यक्तीने आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला नाही. ही घटना घडण्यापूर्वीच तिने तेथील एका किराणा वस्तूंच्या दुकानातून खरेदी केली होती. पण त्या दुकानदाराने किंवा तेथील कर्मचाऱ्यांनीही तरुणाला मदत केली नाही, असे तिने पोलिसांना सांगितले.
ईशान्य भारतातून आल्यामुळे आमच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे. त्यामुळे अनेकवेळा स्थानिक लोक आम्हाला मदत करत नाहीत, असे या मुलीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने म्हटले आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
मणिपूरमधील तरुणीचा मुंबईत विनयभंग, अज्ञाताकडून मारहाण
संबंधित तरुणी गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 03-03-2016 at 13:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipuri woman allegedly thrashed and molested on mumbai street