शिवसेनेतील बंडखोरीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. तरीही शिवसेनेतील ( ठाकरे गट ) गळती थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आता आमदार मनिषा कायंदे ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची माहिती आहे. आज ( १८ जून ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनिषा कायंदे शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश करण्याची शक्यता आहे. मनिषा कायंदे शिंदे गटात गेल्यास ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे.
१९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी वरळीत आज ठाकरे गटाकडून शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराकडे मनिषा कायंदे फिरकल्याच नाहीत. तसेच, त्यांचा फोनही नॉटरिचेबल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. अद्यापही मनिषा कायंदे यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलं नाही.
मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठे नुकसान होऊ शकते.
हेही वाचा : मेडिकल कॉलेजसाठी अब्दुल सत्तारांकडून लष्करी जवानाचा छळ? संजय राऊत म्हणाले, “या औरंग्याच्या पेकाटात…”
ठाकरे गटातील एक आमदार बाहेर पडणार असल्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “कचरा इकडे तिकडे उडत असतो. तो कचरा हवेचा झोका बदलल्यानंतर आमच्या दारात येऊन पडतो. त्याकडे दुर्लक्ष करा.”