मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावरून ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपावर टीका केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणं ही केवळ खेळी असून याद्वारे ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचे काम करण्यात आलं, असा त्यांनी केला आहे.
हेही वाचा – अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतका आडमुठेपणा…”
नेमकं काय म्हणाल्या मनिषा कायंदे?
“अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली असे बोलले जात आहे. जर त्यांना मनाचा मोठेपणा दाखवायचाच होता, तर त्यांना आधीच हा निर्णय घ्याया पाहिजे होता. ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्वीकारणं, त्याना कोर्टाची पायरी चढायला लावणं, त्यांना मनस्ताप देणं, आपल्याच एका सरकाऱ्यांच्या पत्नीशी अशी वर्तवणूक ही अशोभनीय होती”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे.
“आज हे लोक महाराष्ट्राची संस्कृती वगैरे पुढे करत आहेत. मात्र, या खेळीतून त्यांनी दोन हेतू साध्य केले आहेत. एकतर ‘शिवसेना’ हे नाव गोठवण्याचं आणि दुससं ‘धनुष्यबाण’ हे आमचं चिन्ह गोठवण्याच काम त्यांनी केलं आहे. अंधेरीची एक निवडणूक जिंकली किंवा हरली असती, तरी त्यांना काहीही फरक पडला नसता, त्याचं सरकार पडणारं नव्हतं. त्यामुळे हा त्यांचा कट होता”, असा आरोपही त्यांनी केला.