मुंबई : मानखुर्द परिसरात सोमवारी रात्री गॅस गळतीमुळे एका घरात भीषण आग लागली. या आगीत आई आणि दोन मुली अशा तिघी गंभीर जखमी झाल्या. यापैकी १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर आई आणि एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झालेल्या मुलींच्या आईला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशीरा तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.

आगीत तिघी जखमी

मानखुर्दच्या जनता नगर परिसरत वास्तव्यास असलेले शहाबाज खान यांच्या घरात सोमवारी रात्री ८ च्या सुमारास आग लागली होती. खान यांच्या घरातील गॅस सिलेंडरमधून अचानक गळती झाली. त्यानंतर आगीचा भडका उडाला आणि आगीच्या वेढ्यात संपूर्ण घर अडकले. त्यावेळी खान यांची पत्नी फरान खान (३०), मुलगी शरीफा (१५) आणि खुशी (६) या तिघी घरात होत्या. गॅसच्या भडका उडाल्यानंतर त्यांना घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे या तिघी गंभीर जखमी झाल्या.

आईचाही मृत्यू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिघींना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच शरीफाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी फरानला तत्काळ शीव रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिचा सोमवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खुशीवर शताब्दी रुग्णालायत उपचार सुरू आहेत.