मुंबई : रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. या आरोपी विरोधात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभरहून अधिक गुन्हे दाखल असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मानखुर्द परिसरात वास्तव्यास असलेले श्यामराव पोळ (५९) २२ डिसेंबर रोजी मानखुर्दमधील संविधान चौकातून जात असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने अडवले. यावेळी आरोपीने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी काढून घेतली आणि पोबारा केला. काही वेळानंतर पोळ यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर तात्काळ त्यांनी मानखुर्द पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. त्यावरून आरोपीची ओळख पटली. मात्र हा आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. तो २८ डिसेंबर रोजी मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. नरेश जैस्वाल (४४) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात अशाच प्रकारे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत नागरिकांना लुटल्याप्रकरणी शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत.