Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency 2024 SP Abu Azmi vs NDA : मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ पासून हा मतदारसंघ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे राहिला आहे. अबू आझमी सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असून त्यावर अबू आझमी यांची पकड आहे. या मतदारसंघात सध्या तरी आझमी यांना कोणीच आव्हान देऊ शकेल अशी परिस्थिती दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरोधात बहुसंख्य विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर अनेक पक्ष यात सहभागी झाले आहेत. इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून ओळखली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अबू आझमीच मानखुर्द-शिवाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीचा अभेद्य गड मानावा लागेल. कारण या मतदारसंघातील ६० टक्के मतदार शिवाजीनगरमध्ये राहतात, तर ४० टक्के मतदार मानखुर्दमध्ये राहतात शिवाजीनगरमध्ये बहुसंख्य मुस्लीम समुदाय वास्तव्यास असून मतदारांच्या या गटावर अबू आझमी यांची पकड आहे. तर मानखुर्दमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे. इतर कोणत्याही पक्षाला आजवर या मतदारसंघात हातपाय पसरता आलेले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांच्या मते अबू आझमींना यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणे या मतदारसंघात सध्या तरी मोठं आव्हान नाही. महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप झालेलं नसलं तर ही जागा सपालाच सुटेल यात शंका नाही. सपा विद्यमान आमदार अबू आझमी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊ शकते.
हे ही वाचा >> काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?
मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये महाविकास आघाडी ‘पॉवरफुल्ल’
दुसऱ्या बाजूला महायुतीत ही जागा कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित नाही. सपा, शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस या तीन पक्षांव्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाला या मतदारसंघात अद्याप ओळख निर्माण करता आलेली नाही. अबू आझमी यांनी या मतदारसंघात केवळ शिवसेनेचा ठाकरे गटच टक्कर देऊ शकतो अशी स्थिती आहे. मात्र सध्या ठाकरे गट व अबू आझमी एकत्र असल्यामुळे महाविकास आघाडीची या मतदारसंघात मोठी ताकद निर्माण झाली आहे. याशिवाय मनसेचाही येथे लहानसा मतदारवर्ग आहे. यापूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या आप्पासाहेब वगरे यांनी आझमींविरोधात २१ हजार मतं मिळवली होती. तर २०१९ च्या निवडणुकीत संयुक्त शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांना ४३ हजार मतं मिळाली होती.
हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
अबू आझमी (सपा) – ६९,०३६ मतं
विठ्ठल लोकरे (शिवसेना) – ४३,४२३ मतं
सुरैय्या अकबर शेख (वंचित) – १०,४५१ मतं
हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
अबू आझमी (सपा) – ४१,७२९ मतं
सुरेश पाटील (शिवसेना) – ३१,७८२ मतं
युसुफ अब्राहनी (काँग्रेस) – २७,४७४ मतं
हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?
२००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
अबू आझमी (सपा) – ३८,४३५ मतं
सय्यद अहमद (काँग्रेस) – २४,३१८ मतं
आप्पासाहेब वगरे (मनसे) – २१,८३८ मतं
आझमींसमोर नवाब मलिकांचं आव्हान
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून एकूण ४१ इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ अर्ज बाद करण्यात आले आहे, तर. ३७ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने (अजित पवार) येथून नवाब मलिक यांना, तर समाजवादी पार्टीने भाजपाने येथून विद्यमान आमदार अबू आझमी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यासह शिवसेनेचे (शिंदे) सुरेश पाटील हे येथील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर मनसेने जगदीश खांडेकर यांना उमेदवारी दिली आहे.
अबू आझमींची वाट खडतर
अबू आझी यांच्यासमोर यंदा कडवं आव्हान उभं ठाकलं आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांनी अबू आझमी यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. मानखुर्द-शिवाजीनगर हा मतदारसंघ मुंबईतील सर्वांत अविकसित मतदारसंघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगरमधील तरुणाईला अमली पदार्थांचा विळखा बसला आहे. या मतदारसंघात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या काही घटना अलीकडच्या काळात समोर आल्या होत्या. नवाब मलिक यांनी हा मुद्दा धरून जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला एआयएमआयएमने या मतदारसंघात आपले हातपाय पसरले आहेत. त्यांनी यांदाच्या निवडणुकीत एका तरुण व स्थानिक उमेदवाराला संधी दिली आहे. अतिक अहमद खान असं त्या उमेदवाराचं नाव असून, अतिक यांनी जोरदार प्रचार केला आहे. अतिक मतदारसंघातील रहिवासी आहेत. तर, अबू आझमी मतदारसंघात राहत नसल्यामुळे त्यांच्यापेक्षा मी मतदारांना अधिक जवळ असल्याचं अतिक यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अबू आझमी यांच्यासमोर दोन मोठी आव्हानं उभी ठाकली आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात मतदारांकडून संमिश्र प्रतिसाद होता. शिवाजीनगरमधील बहुसंख्य मुस्लीम मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या भागातील काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान चालू होतं.