(
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली असून काही महिन्यांपूर्वी या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. परिणामी, या भुयारी मार्गातून जाताना वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा >>> अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
शीव-पनवेल महामार्गाला लागून असलेल्या महाराष्ट्र नगरमध्ये जाण्यासाठी या परिसरात एक भुयारी मार्ग बांधण्यात आला. या भुयारी मार्गातून लहान वाहनांसह अवजड वाहनांची दिवसभर ये-जा सुरू असते. हा भुयारी मार्ग २० ते २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मात्र, त्याची योग्य देखभाल, दुरुस्ती करण्यात न आल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. हा भुयारी मार्ग खड्डेमय झाला आहे. परिणामी वाहनचालकांना या भुयारी मार्गातून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा >>> Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…
अनेकदा दुचाकी आणि रिक्षासारखी लहान वाहने येथील खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होतात. या अपघातांमध्ये काही जण जखमीही झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या पावसानंतर भुयार मार्ग जलमय होतो. या वर्षीही सलग पडलेल्या पावसानंतर दोन-तीन दिवस हा भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याने भरला होता. परिणामी तीन दिवस येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पालिकेच्या एम-पूर्व विभाग कार्यालयाअंतर्गत हा परिसर येत असून नागरिकांनी अनेक वेळा या भुयारी मार्गाबाबत तक्रारी केल्या. पालिकेने निवडणुकीपूर्वी दुरुस्तीकामाची घोषणाही केली. मात्र, अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही. पालिकेने लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.