मोबाइलवरील एखादा कॉल उचलायचा नसेल तर आपण मोबाइलवरील ‘व्हॉटसअॅप’वर ‘कान्ट स्पीक व्हॉट्सअॅप ओन्ली’ अशी स्टेटस टाकतो. अलीकडे या संदेशाशेजारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा फोटो टाकला जातो. देशाचे पंतप्रधान हे आता ‘व्हॉट्सअॅप’सारखे झाले आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी डॉ. सिंग यांची खिल्ली उडवली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मोहपाडा रसायनी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना उद्धव यांनी मनमोहन सिंग आणि शरद पवार यांच्यासह शेकापमधील नेत्यांवरही टीका केली. यावेळी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.
‘हिंदुत्व हे जातीयत्व नाही तर ते राष्ट्रीयत्व आहे, हे पटल्यामुळेच भीमशक्तीचे नेते रामदास आठवले, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी, धनगर समाजाचे महादेव जानकर, मराठा समाजाचे विनायक मेटे हे शिवसेनेच्या महायुतीमध्ये सामील झाले,’असे उद्धव म्हणाले. कृषीमंत्री पवार यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा क्रिकेटच्या निवडणुकीत रस असून त्यांनी गेल्या पाच वर्षांत कोणत्याही गरजवंत शेतकऱ्यासोबत क्षुल्लक चर्चाही केली नाही. मात्र हेच पवार क्रिकेटपटूंसोबत छायाचित्र काढण्यात गुंग आहेत, असा आरोप उद्धव यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यानंतर गारपीटग्रस्तांचे पीककर्ज, वीजबिल माफ करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जावई होते. आता ते राष्ट्रवादीचे घरजावई बनले आहेत, अशी टीका त्यांनी केली. यावेळी आरपीआयचे रामदास आठवले यांनी काँग्रेसचा पंजा हा शेतकऱ्यांच्या गळ्याला नख लावणारा आहे. आणि राष्ट्रवादीचे घडय़ाळ १० आकडय़ांच्या पुढे कधी जात नसल्याची टीका केली.
मनमोहन सिंग हे व्हॉट्सअॅपसारखे
मोबाइलवरील एखादा कॉल उचलायचा नसेल तर आपण मोबाइलवरील ‘व्हॉटसअॅप’वर ‘कान्ट स्पीक व्हॉट्सअॅप ओन्ली’ अशी स्टेटस टाकतो. अलीकडे या संदेशाशेजारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा फोटो टाकला जातो.
First published on: 31-03-2014 at 04:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh like whatsapp uddhav thackeray