दादरच्या रानडे रोडवर नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी गाडीतून उतरले. सुहास्य वदनाने तेथे जमलेल्या लोकांना त्यांनी नमस्कार केला आणि शिवसेनेच्या आपल्या कार्यालयात जाऊन स्थानापन्न झाले. सरांना त्रास देण्याचा ‘सदा न् कदा’ प्रयत्न करणारे कदाचित शनिवारी घोषणा देण्यासाठी सरांच्या कार्यालयाजवळ जमतील या अपेक्षेने तेथे काही लोकं व मिडियाची मंडळीही जमली होती. परंतु त्यांची निराशा झाली. साधारणपणे तासभर कार्यालयात बसून आलेल्यांशी सरांनी संवाद साधला आणि दादरच्या ‘कोहिनूर’ येथील कार्यालयात रवाना झाले.
शिवसेनेत ‘सर’ म्हणूनच परिचित असलेले मनोहर जोशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यापासून मातोश्रीपासून दुरावले आहेत. त्याचे पडसाद उमटून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि सरांना व्यसपीठावरून अपमानित होऊन जावे लागले होते. त्यानंतर चार दिवसांच्या अज्ञातवासातून परतल्यानंतर दादरमधील आपला ‘क्लास’ सुरुच राहणार असल्याचे सरांनी जाहीर केले. आपली कोणतीही चूक झालेली नसून मातोश्री हे आपल्यासाठी मंदिर असल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे ‘सदोदित’ सरांच्या मागावर असलेल्या ‘घाशीराम कोतवालां’पुढकाय करायचे हा प्रश्न उभा राहिला.
‘मातोश्री’नेही सरांच्या भूमिकेवर सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे मनोहर जोशीही शांतपणे शनिवारी सकाळी रानडे रोडवरील पक्षकार्यालयात आले व उपस्थितांच्या भेटीगाठी घेतल्या. यातील काहीजणांनी दसरा मेळाव्यात झालेल्या अपमानाबद्दल दु:ख व्यक्त केले तर काहींनी बडव्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. सरांनी मात्र साऱ्याकडे आपले ठेवणीतील स्मितहास्य करून पक्षकार्यालयातील तासाचा वर्ग पूर्ण केला आणि कोहिनूरकडे कुच केली.

Story img Loader