पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सातवी जागा महत्त्वाची ठरणार आहे. सर्वच पक्षांकडे अतिरिक्त मते शिल्लक राहणार असल्याने ही मते वळविण्याची ‘ताकद’ असलेला उमेदवार यशस्वी होऊ शकतो. शिवसेना नेतृत्वाची नाराजी ओढवून घेतलेल्या मनोहर जोशींचाही या जागेवर डोळा आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची (प्रत्यक्षात ३६.५० मते) आवश्यकता आहे. मतांचा कोटा प्रत्यक्ष किती मतदान होते यावर ठरतो. काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्याकरिता अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. राष्ट्रवादीला दहा अपक्ष आमदारांचा पािठंबा असल्याने राष्ट्रवादीची दुसरीही जागा सहजपणे निवडून येऊ शकते.
राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान असल्याने मतांची फाटाफूट किंवा घोडेबाजाराला अजिबात स्थान नाही. मनसे (१२) मतांसह भाजपकडील अतिरिक्त दहा, शिवसेना (नऊ) यासह अपक्षांच्या मदतीवर सातवा उमदेवार निवडून येऊ शकतो. मनसे, शिवसेना, भाजप किंवा अपक्षांची मतांची कोण बेगमी करेल तो उमेदवार यशस्वी होऊ शकतो. ‘व्हिडिओकॉन’ उद्योगसमुहाचे राजकुमार धूत शिवसेनेच्या पाठिंब्यावर लागोपाठ दोनदा राज्यसभेवर सातवे उमेदवार म्हणून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा या वेळी सातव्या जागेवर डोळा आहे. शिवसेनेच्या अतिरिक्त नऊ मतांशिवाय जोशी सरांचे गणित जुळणे कठीण आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असली तरी ही मते जोशी यांना मिळतीलच असे नाही. जोशी यांच्याबरोबरच दोन उद्योगपतींनी चाचपणी सुरू केल्याचे समजते.