शिवसेनेत पहिले मुख्यमंत्री तसेच लेखी माफीनामा देणारे पहिले नेते अशी आता मनोहर जोशी यांची ओळख झाली आहे. शिवसेना नेतृत्वाकडून अपमान झाल्यामुळे किंवा मनासारखी पदे न मिळाल्यामुळे पक्षाबाहेर गेलेले अनेकजण असले तरी ‘मातोश्री’ची खप्पामर्जी झाल्यानंतरही माफीनामा देऊन पक्षनिष्ठेचे गोडवे गाणारे मनोहर जोशी हे सेनेच्या आजवरच्या इतिहासात एकमेव नेते ठरले आहेत.
शिवसेनेच्या ‘भूतकाळ व वर्तमानकाळा’वर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविलेल्या मनोहर जोशी यांच्या माफीनाम्यामुळे, सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यादीवरील ‘अस्तनीतील निखाऱ्यां’ना भविष्यकाळाचे मार्गदर्शन झाल्याचे मानले जात आहे. मात्र, जाहीर दिलगिरीनंतरही मनोहरपंतांचे राजकीय पुनर्वसन होणार की नाही, हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.  
एकखांबी रचना असलेल्या शिवसेनेत आजवर बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम होता. उद्धव ठाकरे यांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली असून त्यांच्या नेतृत्वाला आणि निर्णयालादेखील आव्हान नाही हे जोशी प्रकरणामुळे अधोरेखित झाले आहे. गेल्या सुमारे साडेचार दशकांमध्ये शिवसेनेत अनेकजण आले आणि गेले. सुरुवातीच्या काळातच माधव देशपांडे यांचे बिनसले, तर बंडू शिंगरे यांनी ‘प्रति शिवसेना’ काढली. जनता लाटेत डॉ. हेमचंद्र गुप्तेंनी पक्ष सोडला, तर १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला. गणेश नाईक यांच्यासारखा आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ नेत्याला अपमान सहन झाला नाही, तर राज ठाकरे यांनी घुसमट असह्य़ झाल्याने ‘जय महाराष्ट्र’ केला. त्याआधी नारायण राणे यांची हकालपट्टी करण्यात आली. सतीश प्रधान यांचा राष्ट्रवादी, मनसे, असा प्रवास झाला. ही सारी पहिल्या फळीतील नेतेमंडळी होती.
नेतेमंडळी दूर होत असताना मनोहर जोशी मात्र शिवसेनाप्रमुखांच्या जवळ टिकून राहिले. मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचे कान भरल्यानेच आपल्याला शिवसेना सोडावी लागली, असे छगन भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितले होते. केंद्र किंवा राज्यात युतीची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाल्याने मनोहरपंतांनी चैन पडत नाही, अशी शिवसेनेत चर्चा आहे. यामुळेच, पद द्या, लोकसभेला शक्य नसल्यास राज्यसभेची उमेदवारी द्या, अशी त्यांची मागणी होती. उद्धव दाद देत नसल्यानेच पुढे रामायण घडले, आणि ‘आता तरी वाद संपवा’ अशी विनवणी पंतांना करावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा