नेतृत्वाची सध्या खप्पा मर्जी झालेले शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले. सेनेने दक्षिणमध्य मुंबईतून उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यसभेसाठी ही भेट असल्याची चर्चा असली तरी या भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे तसेच केवळ औपचारिक भेट असल्याचे जोशी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना दूर ठेवणेच पसंत केले. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याची भूमिका घेतल्यामुळे मनोहर जोशी अस्वस्थ आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांनी दिल्लीत जाऊन पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे सेनेतूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या निवडणुकीत शरद पवार व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात सामना असल्यामुळे त्यावर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.