शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल स्फोटक विधाने करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी मातोश्रीवर जावे लागले आहे. मनोहर जोशी यांनी आज शनिवार दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरेंसोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत जोशीसरांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमकुवत
मनोहर जोशींनी काल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वक्तव्य केले होते. शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आज असते तर त्यांनी वडिलांच्या स्मारकास विरोध करणारे सरकारच पाडले असते, कार्यकर्त्यांनीही बाळासाहेबांची भाषा वापरली असती तरी एव्हाना शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभे राहिले असते, मात्र आजचे सेनेचे नेतृत्व आक्रमक नसल्यामुळे हे स्मारक रखडले आहे, अशी घणाघाती टीका करीत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर प्रथमच जाहीर तोफ डागली होती. मात्र, आजच्या भेटीनंतर जोशी सरांनी तोफ डागून माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. कारण, भेट घेऊन मातोश्री बाहेर आल्यानंतर सारे काही आलबेल असल्याचा जोशीसरांचा चेहरा होता.