आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-भाजप समन्वय समिती नेमण्यात आली असून पक्षनेतृत्वाची खप्पा मर्जी झालेले शिवसेना नेते मनोहर जोशी यांना दूर ठेवण्यात आले आहे. लीलाधर डाके, गजानन कीर्तीकर आणि सुभाष देसाई यांचा शिवसेनेच्या वतीने समावेश करण्यात आला आहे.
या समन्वय समितीत भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाकडून सरचिटणीस अविनाश महातेकर किंवा अन्य एका नेत्याचा समावेश समितीत केला जाणार आहे. समितीची पहिली बैठक दिवाळीपूर्वी होणार आहे. या समितीची बैठक दर महिन्याला एक-दोन वेळा होईल. दोन-तीन महिन्यातून किंवा निर्णय घेण्याच्या वेळी उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे बैठकीत सहभागी होणार आहेत.
जोशी यांच्यावर उद्धव ठाकरे नाराज असून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या वेळी त्यांचा अपमानही झाला आणि त्यांना मेळावा सोडून जावे लागले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली चूक नसल्याचे स्पष्टीकरणही दिले. पण पक्षनेतृत्वाची नाराजी दूर झालेली नाही. मनोहर जोशी यांना समितीपासून दूर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकांच्या वेळी समन्वय समिती किंवा महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत मनोहर जोशी यांचा सहभाग होता. तो आता संपविण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा