मनोहर जोशी यांचे संकेत
भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे. मतांच्या राजकारणाचा विचार न करता हा पक्ष राम मंदिराचा मुद्दा हाती घेणार असेल तर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र काम करू शकतात, असे विधान करत राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना-भाजप युती होऊ शकते, असे संकेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह शनिवारी सकाळी ११ वाजता अयोध्येला रवाना झाले. मुंबईहून विशेष खासगी विमानाने हे सर्वजण फैजाबादला गेले. त्यापूर्वी मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. राम मंदिराच्या विषयावरून युती होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र काम करू शकतात, असे सूचक विधान जोशी यांनी केले. त्याचबरोबर ज्यांच्या विरोधात बोलायचे त्यांच्याच गळ्यात गळे घालायचे हे राजकारण शिवसेनेला मान्य नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. ठाकरे कुटुंब ज्या कार्यासाठी बाहेर पडले आहे त्यात त्यांना यश मिळो, अशी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना आहे, अशा भावना व्यक्त करताना जोशी भावूक झाले होते.
भाजप-सेनेतील अंतर रामाच्या कृपने संपेल – मुनगंटीवार
प्रभू रामचंद्राच्या कृपेने भाजप-शिवसेनेतील अंतर संपेल. युतीचा मार्ग राज्य महामार्ग होता तो राष्ट्रीय महामार्गासारखा रुंद होईल होईल, अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा शनिवारी सुरू झाला. या दौऱ्याबाबत मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले असतील तर त्यात काहीच गैर नाही. अयोध्येत राम मंदिर उभारले जावे ही देशातील प्रत्येक हिंदूच्या मनातील भावना आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्या गोष्टीसाठी आग्रही आहेत, त्याच गोष्टीसाठी उद्धवही आग्रही आहेत.’