कोकणातील नांदवी या छोटय़ाशा गावातून एक मोठं स्वप्न घेऊन निघालेल्या मनोहर जोशी यांनी आयुष्याच्या वाटचालीत आपली स्वप्ने तर पूर्ण केलीच शिवाय अनेक मानसन्मानही मिळविले. पण ज्या शिवसेनेत शिवसेनाप्रमुखांचे विश्वासू साथीदार म्हणून वावरले आणि शिवाजी पार्कवरील प्रत्येक दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या आधी भाषणाचा मान मिळाला त्याच शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात अपमानाचा घाव झेलत मनोहरपंताना व्यासपीठावरून पायउतार व्हावे लागले.. हे शल्य उराशी घेऊन ७७ वर्षांचे सर आज नांदवीला परतले..
आपल्या वक्तव्यात नेमके चुकले काय, हा सवाल आज त्यांना अस्वस्थ करत आहे. बाळासाहेबांची उंची कोणालाच गाठता येणार नाही.. त्या तुलनेत उद्धव मवाळ आहेत, असा अर्थ निघाला त्यात पक्षनेतृत्वावर टीका कोठे केली? ४५ वर्षे शिवसेनेसाठी खस्ता खाल्लयानंतर लाखोंच्या उपस्थितीत ‘चले जाव’च्या घोषणा काहीजण देतात आणि नेतृत्व गप्प बसते.. दसरा मेळाव्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन खुलासा केल्यानंतर सर्व काही ठीक असल्याचा त्यांचा समज होता.
मेळाव्याच्या दिवशीही मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर सकाळी दोनदा दूरध्वनी केला परंतु नेहमीप्रमाणेच उद्धव फोनवर आले नाहीत, असे सरांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. हाडाचे शिवसैनिक असल्यामुळे दसरा मेळाव्याला जायचेच हे नक्की होते. सायंकाळी काही तरुण शिवसैनिकांनी ओशियाना गाठला आणि आम्ही तुम्हाला मेळाव्याला जाऊ देणार नाही, असा इशारा दिला. पोलिसांचा बंदोबस्त मोठा होता. सरांना अडविण्याची हिम्मत तरुण शिवसैनिकांमध्ये होत नव्हती. उद्धव मातोश्रीवरून निघाल्याचे समजले आणि सरांनी मेळाव्यास निघण्याची तयारी सुरू केली. विरोध झालाच तर शिवसैनिकांना नमस्कार करायचा आणि परत फिरायचे हे त्यांनी नक्की केले होते. कारण ते बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. अपेक्षेप्रमाणे सर सभास्थानी जाण्यास निघाले तेव्हा त्यांना कोणी अडवले नाही.. सभास्थानी जाताच समोरून सुरू झालेली घोषणाबाजी थांबविण्याचा पक्षनेतृत्वाने प्रयत्न केला नाही आणि शिवसैनिकांना नमस्कार करून सर व्यासपीठावरून निघाले.
१९९२ सालातील आठवणी त्या वेळी त्यांच्या मनात ताज्या झाल्या होत्या. ठाकरे कुटुंबीयांचा शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ बाळासाहेबांनी करताच शिवसैनिकांचा अंगार पेटून उठला. सेनेच्या भल्या भल्या नेत्यांच्या उरात धडकी भरली. परंतु बाळासाहेबांनी सर्व नेत्यांना सेनाभवनाखाली ट्रकवर बोलावून हे माझे सहकारी आहेत असे सांगताच शिवसैनिक शांत झाले आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वावर पक्का शिक्कामोर्तब झाला. अपमानाच्या भळभणाऱ्या जखमा आणि ४५ वर्षांच्या आठवणी घऊन मनोहरपंतांनी अखेर पुन्हा नांदवी गाठली..