माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचा मुलगा उन्मेश जोशी यांच्या हातून दादरमधील कोहिनूर स्क्वेअर हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट निसटला आहे. 2000 कोटींचा हा प्रोजेक्ट रिअल इस्टेटमधील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. 900 कोटींचं कर्ज न फेडल्याने उन्मेश जोशी यांना हा प्रोजेक्ट गमवावा लागला आहे. प्रभादेवीमधील आर्किटेक कंपनी संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्सला हा प्रोजेक्ट मिळाला असून त्यांनी यावर काम सुरु केलं आहे. मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोहिनूर स्क्वेअर प्रोजेक्टचं काम बंद पडलं होतं. बँकांकडून घेतलेलं 900 कोटींचं कर्ज फेडण्यात कोहिनूर ग्रूप अपयशी ठरला होता. यामुळे संबंधित बँकांनी जून 2017 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे धाव घेतली होती. ट्रिब्यूनलने प्रोजेक्ट संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्सला देण्याची शिफारस स्विकारल्याने उन्मेश जोशी यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स 26 जानेवारीला प्रोजेक्टचं काम सुरु करणार आहे. पुढील 15 ते 18 महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.
आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस
दादरमध्ये शिवसेना भवनसमोर असणाऱ्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीचं काम 2009 मध्ये कोहिनूर ग्रुपकडून सुरु करण्यात आलं होतं. सुरुवातीला या ठिकाणी आशियातील सर्वात मोठं पंचतारांकित हॉटेल उभारण्याची योजना होती. पण 2013 मध्ये 52 आणि 35 माळ्याच्या दोन भव्य इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. एका इमारतीत पंचतारांकित हॉटेल्स आणि दुसरी इमारत पूर्णपणे रहिवासी करण्याचं ठरवण्यात आलं होतं. पण दोन वर्षांपासून काम पूर्णपणे थांबलं होतं.