दसरा मेळाव्यात काही शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा दिल्यानंतर व्यासपीठ सोडून मेळाव्यातून काढता पाय घेणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी शुक्रवारी मुंबईत परतले. जोशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी मुंबईत परतल्यानंतर पत्रकारांना सांगितले आहे. 
काळवंडला तरी ‘कोहिनूर’च!
मी कुठेही चुकलेलो नाही. मी आधीही शिवसैनिक होतो आणि आताही शिवसैनिकच आहे, अशी भावना त्यांनी पत्रामध्ये व्यक्त केल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांना लिहिलेले हे अतिशय खासगी पत्र असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. दसरा मेळाव्यातील घटना कशामुळे घडली, याची सत्य परिस्थिती मी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवल्याचे जोशी यांनी सांगितले. त्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे आपल्याला दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या चार दिवसांपासून जोशी कुटुंबीयांसमवेत मुंबईबाहेर होते.
सरांचे नांदवी ते नांदवी व्हाया शिवाजी पार्क..
दसरा मेळाव्याअगोदर मुंबईतील एका कार्यक्रमात जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर आक्षेप घेणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. मात्र, गेल्या रविवारी झालेल्या दसरा मेळाव्यात काही शिवसैनिकांनी मनोहर जोशी हाय…हाय…च्या घोषणा दिल्या. या घोषणानंतर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण पूर्ण होण्याआधीच मेळाव्यातून काढता पाय घेतला होता. दसरा मेळाव्यात घडलेला प्रकार हा गैरसमजातून घडल्याची प्रतिक्रिया जोशी यांनी शिवाजी पार्कवरून परतताना पत्रकारांना दिली होती.
मनोहर जोशींचे नाव निमंत्रण पत्रिकेतून गायब